

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ ः महापालिकेत १० स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय सोमवारच्या (ता. २०) सर्वसाधारण सभेसमोर आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे सात व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने तिघांची नावे आयुक्तांकडे दिली आहेत. मात्र, त्यातील दोन नावांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने नियुक्ती पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादी विरोधी पक्ष आहे. १२८ सदस्यीय सभागृहात शासनाच्या निर्णयानुसार दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. म्हणजेच १२.८ सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य असेल. भाजपच्या एका अपक्षासह ८५ सदस्यांमागे सात आणि राष्ट्रवादीच्या ३७ सदस्यांमागे तीन असा कोटा आहे. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने फेब्रुवारीच्या सभेत निर्णय होऊ शकला नाही. प्रदेश समितीकडून सात नावे निश्चित न झाल्याने मार्चच्या सभेतही विषय तहकूब ठेवण्यात आला. आता एप्रिलच्या सभेसमोर विषय प्रस्तावित आहे. मात्र, भाजपने नावे उघड केलेली नाहीत. ऐनवेळी सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. २०) नावे सादर केली जाऊ शकतात. त्यांची छाननी करून आयुक्त नावे जाहीर करतील. पण, नावे निश्चित नसल्यास विषय पुन्हा तहकूब होऊ शकतो.
विरोध कोणत्या नावाला
राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकृत सदस्यपदासाठी तिघांची नावे चार मार्चला आयुक्तांकडे दिली. भाजप कोअर कमिटीने प्रदेश समितीकडे नावे पाठवली आहेत. मात्र, रविवारपर्यंत ती उघड केली नव्हती. याशिवाय, दहा पैकी दोन सदस्यांच्या नावाला काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली आहे. ‘ती’ व्यक्ती सभागृहात नको, असा सूर आळवला गेला आहे. त्यामुळे नावाबाबत फेरविचार होऊ शकतो. परिणामी निवड पुन्हा लांबणीवर पडू शकते.
भाजपकडून कोणाची वर्णी ?
महापालिका निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपद देऊ नये, असे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. तसे घोषितही केले आहे. मात्र, महापालिकेत अभ्यासू नेतृत्व असावे, निष्ठावंतांना पद मिळावे, यासाठी निवडणूक लढवलेल्या, मात्र प्रतिकूल कौल मिळालेल्या किमान एक-दोन सदस्यांना संधी मिळावी, अशीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या सात नावात कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे. मात्र, रविवार सायंकाळपर्यंत त्यांची नावे गुलदस्त्यात होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.