भोसरी औद्योगिक परिसरातील पर्यावरण उद्यान दुर्लक्षित
पिंपरी, ता. ३ : भोसरी येथील औद्योगिक परिसरात पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून महापालिकडून विकसित करण्यात आलेल्या पर्यावरण संस्कार उद्यानाचा मूळ उद्देश पूर्णपणे बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे. आयुर्वेदिक वनस्पती, नक्षत्र वन, विद्यार्थ्यांना वनस्पती शास्त्राचा अभ्यास करता यावा, तलाव, विविध वृक्ष प्रजाती, मासे तसेच नागरिकांसाठी ‘जॉगिंग पार्क’ अशी संकल्पना मांडून या उद्यानाची उभारणी करण्यात आली होती.
पूर्वी या ठिकाणी शहरातील भंगार साहित्य तसेच राडारोडा टाकला जात होता. ते साफ करून रोपांची नर्सरी, हिरवळ आणि उद्यान विकसित करण्याचे काम महापालिकेने केले होते. मात्र आता या उद्यानात त्या कामाचा फारसा लवलेशही दिसून येत नाही. उद्योजकांच्या मते, उद्यानाचे प्रवेशद्वार बहुतांश वेळा बंदच असते. शासकीय वेळेनुसारही गेट नियमितपणे उघडे नसल्यामुळे नागरिक, विद्यार्थी व शालेय सहलींची संख्या घटली आहे. उद्यानात देखरेखीचा अभाव असल्याने वृक्षचोरीसारख्या घटना घडत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परिसरात कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उद्यान परिसरातील गवत वाढल्यामुळे साप, कीटक तसेच अन्य जीवजंतूंमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तलाव परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून मच्छरांचा त्रास नागरिकांसाठी समस्या ठरत आहे. याशिवाय स्वच्छतागृहांची अवस्था खराब असून नियमित स्वच्छता होत नसल्याचे दिसून येते. बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था नसणे, अपुरा विद्युत पुरवठा आणि देखभाल दुरुस्तीचा अभाव यामुळे उद्यानाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि औद्योगिक परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी हिरवळ निर्माण करण्याचा उद्देश असलेले हे पर्यावरण उद्यान सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्क्रिय ठरत आहे. प्रवेशद्वाराचे वेळापत्रक निश्चित करणे, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि नियमित देखभाल सुरू न झाल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अपयशी ठरण्याची भीती उद्योजक व नागरिक व्यक्त करत आहेत.
पर्यावरण उद्यानाचा मुळे उद्देश सफल झालेला नाही. या उद्यानात सुविधांचा अभाव आहे. सुविधांबाबत लक्ष देण्याची मागणी सातत्याने अधिकाऱ्यांकडे केली आहे, तरीही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. त्या ठिकाणी काय अडचणी आहेत, हे पाहून संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगून उद्यानात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. सध्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित सुरू आहे.
- महेश गारगोटे, विभाग प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

