‘पार्ट-टाइम जॉब’ला विद्यार्थ्यांची पसंती
आशा साळवी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ ः वाढत्या महागाईच्या काळात शिक्षणही महाग झाले आहे. अगदी नर्सरीपासून महाविद्यालयापर्यंत कोणत्याही इयत्तेत कुठेही प्रवेश घेताना डोनेशनपासून शैक्षणिक शुल्कासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अशावेळी उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणी ‘पार्ट-टाइम जॉब’ करण्याकडे वळत आहेत. कुटुंबापासून, घरापासून, गावापासून लांब येऊन शिकणारे अनेक विद्यार्थी शिक्षण, इतर खर्चाची सांगड घालण्यासाठी एकीकडे अध्ययन आणि दुसरीकडे कमाई अशा दोन्ही आघाड्यांवर लढत असतात.
कोविडनंतर ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ मिळू शकतो. तो अशा कामात गुंतवल्यास अनुभव मिळतो, कमाई होते अन् आत्मविश्वासही वाढतो, अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी मिळावी म्हणून अनिवार्य असलेले ‘वर्क एक्स्पोजर’ही त्यांना मिळते. वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्ये आणि जबाबदारीची भावना त्यांच्यात रुजत आहे. हा सकारात्मक बदल आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पैशाचीच किंमत कळते असे नाही, तर तरुण वयातच त्यांना बाजाराची गती आणि कार्यसंस्कृतीशी जुळवून घेता येते. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी तसेच स्वखर्चाने उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी अवलंब केलेल्या ‘पार्ट-टाइम जॉब’ त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक आघाडीवर स्वावलंबी बनवितो.
असे आहेत पर्याय
शिक्षणासोबतच नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. यात साईज जॉब, पार्ट टाइम जॉब, व्हेकेशन जॉब, विकेंड जॉब, इव्हिनिंग जॉब असे अनेक पर्याय आहेत. यापैकी जे शक्य होईल ते पर्याय विद्यार्थी निवडतात. पूर्वी फक्त सुट्यांमध्ये काम करण्याची प्रवृत्ती होती, पण आता वर्षभर डिलिव्हरी रायडर, कॅफे असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली दिसून येते.
---
मी शिक्षण घेतानाच ‘पार्ट टाइम जॉब’ करतो आहे. कॉलेज झाल्यावर मी घराजवळच एका कंपनीत कामाला जातो. यामुळे मी टाइम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन आणि पैसे कमावून ते टिकवून कसे ठेवायचे ते शिकलो. स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी पैसे किती महत्त्वाचे असतात, ते कळले.
- सतीश शहा, एसएनबीपी विधी महाविद्यालय
---
सध्याच्या महागाईमुळे ग्रामीण भागातून शहरांमध्ये शिक्षण घेणे फारच कठीण झाले आहे. शासनाकडून मिळणारे निर्वाह भत्ते सुद्धा वेळेवर जमा होत नाहीत. त्यामुळे, शहरी भागात शिक्षण व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ‘पार्ट टाइम जॉब’ चा आधार घ्यावा लागतो. यातून मिळणाऱ्या पैशातून शहरामध्ये उदरनिर्वाहास व शिक्षणाच्या खर्चास थोडाफार हातभार लागतो. मी पिंपरीमध्ये एमसीएचे शिक्षण घेत भाडेकरार नोंदणीसाठी ‘पार्ट टाइम जॉब’ करतो.
- सम्मेद गिरमल, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, पिंपरी
---
मी एका कंपनीत इंटरनेटवर डेटा एंट्री जॉब करत होते. स्वतःचा खर्च स्वतः करायचा आणि घरात हातभार लावण्याच्या उद्देशाने मी हे काम करते. मला या कामाचा खूप फायदा झाला, कारण पदवी पूर्ण होताच मला चांगला जॉब मिळाला. शिक्षण घेतानाच अनुभव आल्यामुळे आत्मविश्वास, कौशल्य दुणावले.
- वृषाली लाटे, विद्यार्थिनी
-----
इमेज
82231

