महापालिका निवडणुकीसाठी बहुतांश महिला अधिकारी
पिंपरी, ता. १३ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर काम पहात आहेत. मात्र, क्षेत्रीय कार्यालयनिहाय केलेले रचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे आठ अधिकारी यंत्रणा हाताळत आहेत. यामध्ये तब्बल पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, माध्यम समिती प्रमुख, निवडणूक निरीक्षक आणि आचारसंहिता कक्षप्रमुखही महिला अधिकारीच आहेत. त्यामुळे महापालिकेची बहुतांश निवडणूक महिला अधिकारीच हाताळत असल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणूक ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी होत आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रभागांची विभागणी आठ भागात केली आहे. त्यांची जबाबदारी आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आहे. एका अधिकाऱ्यांकडे चार प्रभागांची जबाबदारी आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी आचारसंहिता कक्ष, निवडणूक निरीक्षक, प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती असे वेगवेगळे विभाग करून त्यांची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्यांकडे दिली आहे. यातील बहुतांश अधिकारी महिला आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक विभागाचे कामकाज सुरू आहे. शिवाय, महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती अभियान सुरू आहे. त्याची ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडे काम पहात आहे.
महिला निवडणूक निर्णय अधिकारी आणि जबाबदारी
अ क्षेत्रीय कार्यालय ः पल्लवी घाडगे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, पुणे) ः प्रभाग १०, १४, १५ व १९
ब क्षेत्रीय कार्यालय ः अर्चना तांबे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, पुणे) ः प्रभाग १६, १७, १८, २२
इ क्षेत्रीय कार्यालय ः दीप्ती सूर्यवंशी (उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए) ः प्रभाग ३, ४, ५, ७
ग क्षेत्रीय कार्यालय ः सुप्रिया डांगे (उपजिल्हाधिकारी, रस्ते विकास महामंडळ) ः प्रभाग २१, २३, २४, २७
ह क्षेत्रीय कार्यालय ः अर्चना पठारे (उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक औद्योगिक अधिकारी) ः प्रभाग २०, ३०, ३१, ३२
निवडणूक यंत्रणेतील अन्य महिला अधिकारी
सुरेखा माने ः उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षप्रमुख
तृप्ती सांडभोर ः अतिरिक्त आयुक्त महापालिका तथा प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती अध्यक्षा
निवेदिता घार्गे ः महापालिका क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
सरिता नरके ः सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा तथा निवडणूक निरीक्षक

