सावधान, संक्रांतीचे वाण देताय ?
पिंपरी, ता. १३ ः निवडणूक आचारसंहिता काळात मकरसंक्रांतीचा सण आला आहे. यानिमित्त मतदारांना भेटवस्तू (वाण) देऊन आमिष दाखविल्यास संबंधित उमेदवारावर कायदेशीर कारवाई होणार आहे. असे आढळल्यास नागरिकांनी महापालिका व संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील आचारसंहिता कक्षास संपर्क साधून माहिती कळवावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
निवडणूक आचारसंहिता काळात येणाऱ्या सार्वजनिक सणामधील आचरणाबाबत राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यामुळे मतदारांना कोणतेही प्रलोभन दाखवता येणार नाही. नागरिकांनीही अशा प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन निवडणूक आचारसंहिता कक्षाने केले आहे.
भरारी पथकाची करडी नजर
मते मागण्यासाठी लाच देणे व लाच घेणे हा भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १७० नुसार गुन्हा असून यासाठी एक वर्षाच्या कालावधीपर्यंत शिक्षा होऊ शकते. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरांमध्ये एकूण ३४ भरारी पथके व ३४ एसएसटी पथके कार्यरत असून या सर्वांची अशा घटनांवर २४ तास नजर आहे, अशी कोणतीही घटना होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ महापालिकेच्या मुख्य कार्यालयास व संबंधित क्षेत्रीय कार्यालयात स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्षास संपर्क करावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
उमेदवार काय करू शकतात?
- राजकीय पक्षाचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते सण-उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्तिगतरीत्या सहभागी होऊ शकतात
- सण-उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये
- कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये
- निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये भोजनावळी, जेवणाचे कार्यक्रम घेऊ नयेत
- बुधवारी (ता. १४) मकर संक्रांतीचा सण येत असल्याने महिलांना वाण देण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष, उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी वस्तूंचे, पैशाचे वाटप करू नये
-----

