भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर पवारांचे पुन्हा टीकास्त्र
पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी प्रचाराचा समारोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व पुन्हा लक्ष करत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर डाव टाकून असा फिरवून टाकेन, घुटनाचित कसे करायचे? मला माहिती आहे. मी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचा अध्यक्ष आहे हे विसरू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १३) प्रचाराची सांगता झाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरव, नवी सांगवीत येथे रोड शो, भोसरी आणि दापोडीत सभा घेतली. त्यांत भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘महापालिकेत सत्ता आल्यास भोसरीतील पीसीएमटी चौकात विजयी सभा घेणार आहे. फक्त १५ तारखेला नासका आंबा काढा. नाहीतर सर्वांना खराब करेल. काही जण लोक भंगाराची वाहने इकडून तिकडे पोचवायची चुकीची कामे करत होती. त्यामधून संपत्ती कमावली आहे. टँकर माफिया उमेदवार न देता मी उच्चशिक्षित उमेदवार दिले. आपल्याला भ्रष्टाचाराचा राक्षस हटवायचा आहे. भोसरीची बिकट अवस्था आहे. इथे भंगाराचे दरोडेखोर आहेत. गरिबांना विनाकारण टॅक्स न लावता आर्थिक सक्षम आहेत त्यांना लावायला हवे. पवना आणि इंद्रायणी नदीपात्र दूषित झाले आहे. त्यामुळे मी कारभारी पाहिजे का तो, हे विचारायला आलोय. माझ्यात काम करण्याची धमक आहे.’’
दापोडीत पदाधिकाऱ्यांना इशारा
दापोडीत पॅनेल टू पॅनेल मतदान झाले पाहिजे. काही जण चुकीचा सल्ला देत आहेत. त्यांनी थांबावे. अन्यथा मला थांबवावे लागेल. कोणी चुकीचे सांगत असल्यास फोन रेकॉर्ड करून मला पाठवा. त्याला सरळ करणार, तो फोनही मला करणार नाही, असा इशारा अजित पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दापोडीतील सभेत दिला.
महिला कॉन्स्टेबलला भोवळ
भोसरीतील पीसीएमटी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भर उन्हात सभा सुरू होती. यावेळी भोवळी आल्याने महिला पोलिस कॉन्स्टेबल खाली पडल्या. उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ सभास्थळावरून रुग्णालयात दाखल केले.
अजित पवार म्हणाले...
- तोंडात मुख्यमंत्री शब्द आला, पण होईना, लाडक्या बहिणींनी मनावर घेतले तर होईन
- मला महापौर राष्ट्रवादीचा बसणार असा अहवाल प्राप्त झाला आहे
- विकासासाठी दोन्ही राष्ट्रवादी एक, शिवसेनेला सोबत घेतले, मला वाद घालायचा नाही
- विरोधकांनी भ्रष्टाचार करण्यासाठी सगळे घरदार कामाला लावले
- भोसरीत घर बांधायला गेले तरी विविध प्रकारे लूट करण्यासाठी आका येतात
- आता हवा बदलली आहे, सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे
- माझ्या सभेला परवानगी मिळू दिली नाही, पहाटे पाचला परवानगी दिली
- सगळेच प्रबळ उमेदवार असल्याने दापोडीतील अनेकांना उमेदवारी देता आली नाही
- दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी आरक्षण विकसित करणार आहे, सध्या निधीअभावी रखडले आहे
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

