गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

ओव्हरटेकच्या वादातून जीवघेणा हल्ला
पिंपरी ः ओव्हरटेकच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास घडली. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दिवाकर सुरेंद्र सिंग (रा. बोपखेल, पुणे), गणेश बांगर (रा. दिघी, पुणे), करण मोळक (रा. बोपखेल, पुणे), अमोल गिरी, अर्शद (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्‍यांचा एक साथीदार (नाव, ‍पत्ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. त्यातील आरोपी गणेश आणि करण यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील महेंद्र वाघमारे (वय २७, रा. आंबेडकर चौक, रामनगर, बोपखेल) यांनी मंगळवारी (ता. १३) याबाबत दिघी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे वडील महेंद्र रवींद्र वाघमारे हे दुचाकीवरून जात असताना हा प्रकार घडला.

महिलेची ५५ लाखांची फसवणूक
पिंपरी ः शेअर व आयपीओमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका गृहिणीकडून तब्बल ५५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना पुनावळे परिसरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. गुंजन गौरव अट्रावलकर (वय ३१, रा. फ्लॅट नं. ६०३, गाया-बी, पुनावळे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी मंगळवारी (ता. १३) याबाबत रावेत पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. ही घटना २८ जुलै ते ४ सप्‍टेंबर २०२५ या कालावधीत पुनावळे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी स्टॉक अध्ययन समूह या ग्रुपमध्ये जोडून विश्वास संपादन केला. त्यानंतर लिंकद्वारे नुवाप्रो ॲपवर गुंतवणुकीच्या नावाखाली विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले.

जाब विचारल्याने तरुणाला मारहाण
पिंपरी ः शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला दगड मारुन मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (ता. १२) सकाळी पावणे बारा वाजताच्‍या सुमारास खेड तालुक्‍यातील महाळुंगे कडुस रस्त्यावरील कोरेगाव गावठाण परिसरात घडली. विजय नारायण झांबरे (वय ४५, रा. कोरेगाव, ता. खेड) व त्‍यांचा एक साथीदार (नाव, ‍पत्ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. वैभव पांडुरंग मेदनकर (वय २५, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्‍यासाठी गेलेल्‍या आयशर वाहनावरील चालकाने फिर्यादीच्या कपाळावर दगड मारून जखमी केले. तसेच दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे मित्र प्रज्वल शितोळे व प्रणव खंडागळे यांना मारहाण करून दमदाटी केली.

ट्रेलरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू
पिंपरी ः भरधाव वेगातील ट्रेलरने स्कूटीला धडक दिल्याने झालेल्‍या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास निगडीतील थरमॅक्स चौकात घडली. आशा लोखंडे (वय ३१) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या महिलेचे नाव आहे. सुशीला वामन घोडके (वय ४५, रा. आझाद चौक, ओटास्‍कीम, निगडी) यांनी मंगळवारी (ता. १३) याबाबत निगडी पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात ट्रेलर चालक नूर इस्लाम गुमाणी (वय ४२, रा. सध्या कळंबोली, जि. रायगड; मूळ रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीवरून निगडीकडे येत असताना थरमॅक्स चौकाच्‍या पुढे आल्‍यावर भरधाव वेगातील ट्रेलरने धडक दिली. त्यात मागे बसलेल्या आशा लोखंडे या ट्रेलरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अल्‍पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त
पिंपरी ः एका अल्‍पवयीन मुलाकडून बेकायदेशीररीत्या बाळगलेले गावठी पिस्तुल जप्‍त करण्‍यात आले. ही कारवाई सोमवारी (ता. १२) दुपारी पावणेचार वाजताच्‍या सुमारास भोसरीतील मोहननगर परिसरात करण्‍यात आली. गुन्‍हे शाखा युनिट तीनमधील पोलिस हवालदार सोमनाथ बाबासाहेब बोऱ्हाडे (वय ४३) यांनी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्‍पवयीन मुलाच्‍या

विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मोहननगर, भोसरी येथील स्वप्नील किराणा स्टोअर्सजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्याने तपास केला असता आरोपीकडे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आढळून आले.

निगडीत एमडी ड्रग्जसह तरुणास अटक
पिंपरी ः एका तरुणाला पोलिसांनी मॅफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थासह अटक केली आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाकडून १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्‍या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्वप्नील सुदाम पांढरे (वय ३४, रा. पांढरवस्ती, पुनावळे) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्‍हे शाखा युनिट एकच्‍या पथकातील पोलिस अंमलदार तेजस मारुती भालचिम यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी स्‍वप्‍नील याच्‍याकडे सुमारे १० हजार रुपये किमतीचा एमडी अमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगताना आढळून आला.

ओझर्डेमधील हातभट्टीवर पोलिसांचा छापा 
पिंपरी ः हातभट्टी दारू तयार करण्यासाठी ठेवलेला कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १३) दुपारी बारा वाजताच्‍या सुमारास मावळ तालुक्यातील ओझर्डे गावच्‍या हद्दीत पवना नदीकाठी करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस अंमलदार दिलीप विश्वनाथ राठोड यांनी शिरगाव पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुमारे एक लाख ५ हजार रुपये किमतीचा कच्चा माल आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी घटनास्थळावरून पळून गेली.

गावठी दारूचे कच्चे रसायन जप्त
पिंपरी ः दक्षिण चाकण परिसरातील साबळेवाडी येथे गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. १३) दुपारी करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. गुन्‍हे शाखा युनिट तीनमधील पोलिस अंमलदार सुधीर शिवाजी दांगट (वय ४०) यांनी दक्षिण चाकण पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळेवाडी परिसरात प्लास्टिक व लोखंडी ड्रममध्ये सुमारे १,५०० लिटर, अंदाजे ७५ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन आढळून आले.

आळंदीत हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट
पिंपरी ः हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले तब्बल तीन हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. ही कारवाई मंगळवारी (ता. १३) आळंदी परिसरातील मरकळ गावाजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणात अरुण करवाशिया (रा. वडगाव शिंदे, जि. पुणे) हा आरोपी निष्पन्न झाला असून तो सध्या फरार आहे. गुन्‍हे शाखा युनिट तीनमधील पोलिस अंमलदार समीर कुंडलीक काळे यांनी आळंदी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मरकळ गावच्‍या हद्दीतील एका मोकळ्या जागेत आरोपीने अंदाजे एक लाख ५० हजार रुपये किमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन भिजत घातले होते. हे साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com