धाकधूक, उत्साह आणि जल्लोष
पिंपरी, ता. १६ ः मतदान झाल्यापासून मतमोजणी सुरू होईपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये धाकधूक होती. पिंपरी चिंचवडमधील आठही मतमोजणी केंद्रांबाहेर मोठी गर्दी होती. फेरीनिहाय किती मते मिळाली ? त्याची माहिती घेऊन इतरांना पाठवण्यात उत्साह दिसून आला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ठिकठिकाणचे विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. विजयाच्या घोषणा देत काहींनी गुलाल, तर काहींनी भंडारा उधळला. अखेर भारतीय जनता पक्षाला सत्ता राखण्यात यश मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे शुक्रवारी (ता. १६) स्पष्ट झाले.
महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गुरुवारी (ता. १५) दोन हजार ६७ केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली होती. शुक्रवारी (ता. १६) सकाळी दहापासून आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ ठिकाणी मतमोजणी झाली. त्यामुळे आठही ठिकाणी सकाळपासून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली. उमेदवार प्रतिनिधींनाच मतमोजणी ठिकाणच्या परिसरात प्रवेश दिला जात होता. मात्र, आत सोडण्यावरून पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले. प्रत्येक ठिकाणच्या शंभर मीटर अंतराबाहेर बॅरिकेडस् लावले होते. त्यापलीकडे सर्वच ठिकाणी गर्दी होती. फेरीनिहाय मिळालेली मते उमेदवारांच्या नावांसह ध्वनिक्षेपकांवरून जाहीर केले जात होते. आघाडी घेतलेल्या उमेदवारांचे समर्थक जल्लोष करीत होते. अखेर सायंकाळी सर्व फेऱ्यांनुसार मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार घोषित केले. साधारणतः एक-दोन फेऱ्या शिल्लक असताना मताधिक्याचा अंदाज घेत कार्यकर्त्यांची भूमिका ठरत होती. विजयाच्या उंबरठ्यांवरील उमेदवाराचे समर्थक जल्लोष करत होते, तर पराभवाच्या छायेतील उमेदवाराच्या समर्थकांनी काढता पाय घेतला.
प्रभागांमध्ये जल्लोष
विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी आपापल्या प्रभागांत जाऊन विजयी गुलाल उधळला. उमेदवाराचे घर, जनसंपर्क कार्यालय परिसरात ढोल-ताशे लावून आणि पक्षाचे झेंडे फडकवत जल्लोष केला. काहींनी दुचाकी फेरी काढून घोषणाबाजी करीत विजयाचा आनंद साजरा केला.
क्षणचित्रे...
- कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांकडून पुन्हा मतमोजणीची मागणी
- विजयी जल्लोषात गुलाल, भंडारा, फुलांसह सिलिंडरमधील रंगीत गॅसची उधळण
- भोसरीत हलगी व ढोल वाजवणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडले
- अनेक ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांची मध्यस्थी
- वाहन फेरी दरम्यान काहींच्या समर्थकांकडून कर्णकर्कश आवाजाने त्रास
- फेरीनिहाय अनेकांची धाकधूक वाढत, मताधिक्य मिळाल्यावर जल्लोष, अन्यथा शांतता
- अनेक ठिकाणी पॅनेल टू पॅनेल विजय, काही ठिकाणी उमेदवारनिहाय मतदान झाल्याचे स्पष्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

