महापालिका स्थायी समितीसाठी ‘फिल्डिंग’

महापालिका स्थायी समितीसाठी ‘फिल्डिंग’

Published on

पिंपरी, ता. १२ ः महापालिका तिजोरीच्या चाव्या अशी ओळख असलेल्या स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र, पक्षाची कोअर कमिटी प्रदेश समितीला कोणाच्या नावांची शिफारस करते? प्रदेश समिती कोणाला संधी देते? त्यात पक्षातील ज्येष्ठ, नवखे की निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्यांच्या नावाला पसंती मिळते, याची उत्सुकता आहे.
भारतीय जनता पक्षाने महापौर, उपमहापौर आणि पक्षनेते पदांवर तिघांना संधी दिली आहे. आता स्थायी समितीसह विविध विषय समित्यांवर कोणाला संधी मिळते? याकडे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर निवडीसाठी शुक्रवारी (ता. ६) आयोजित विशेष सभेनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायीसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार होती. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब केली आहे. त्यामुळे सर्वच समिती सदस्यांची निवड लांबणीवर पडली आहे.

यापूर्वीचे नाराजी नाट्य
महापौर व उपमहापौरपदासाठी अनुक्रमे रवी लांडगे व शीतल शिंदे यांची नावे निश्चित होती. मात्र, शिंदे यांनी उपमहापौरपद नाकारले. त्यामुळे ऐनवेळी ज्येष्ठ नगरसेविका शर्मिला बाबर यांना पक्षाने संधी दिली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, शिंदे यांना स्थायी समिती पाहिजे, अशी चर्चा रंगली होती.

अशी होईल निवड
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात पक्ष सदस्यांचा कोटा ठरवला जातो. त्यानुसार भाजपच्या वाट्याला ११, राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला एक जागा मिळणार आहे. या १६ सदस्यांमधून एकाची अध्यक्षपदी निवड होईल. त्यामुळे भाजप कोअर कमिटी त्यांच्या सदस्यांची नावे निश्चित करून प्रदेश समितीकडे पाठवणार आणि त्यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब होईल.

समतोल साधण्याची शक्यता
पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले मात्र मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेस, नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेले आणि निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भाजपमध्ये आलेले रवी लांडगे यांना पक्षाने महापौरपद, मुळच्या पक्षाच्या शर्मिला बाबर यांना उपमहापौरपद आणि निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले प्रशांत शितोळे यांना पक्षनेतेपद दिले आहे. आता स्थायीसह विषय समित्यांचे सदस्य व अध्यक्षपदी कोणाला संधी देतात? यात निष्ठावंत व अनुभवी सदस्य असतील? अनुभवी की निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून आलेल्यांचा समावेश असेल? पक्षीय समतोल साधण्यासाठी जुन्या, नव्यांचा समावेश असेल का? पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्याला संधी मिळणार? याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेचीही तयारी
राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेला स्थायी समितीवर अनुक्रमे तीन आणि एक सदस्याला संधी मिळणार आहे. दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी स्थायीसाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना तर शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांना संधी दिली आहे. दर दोन वर्षांनी स्थायीचे सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे पुढील पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या नऊ व शिवसेनेच्या तिघांना संधी मिळेल. अन्य विषय समित्यांवर मात्र भाजप व राष्ट्रवादीच्या सदस्यांना संधी मिळणार आहे. मनुष्यबळ व समिती सदस्यांचा कोटा निश्चित असल्याने शिवसेना सदस्यांना संधी मिळणार नाही.

‘‘स्थायी व अन्य विषय समिती सदस्य निवडीसाठी कोअर कमिटीची बैठक होईल. त्यामध्ये समिती सदस्यांची नावे निश्चित करून प्रदेश समितीकडे पाठवले जातील. दोन दिवसांत ही नावे निश्चित केले जातील. प्रदेश समितीकडून आलेली नावे सर्वसाधारण सभेत
पीठासीन अधिकाऱ्यांकडे दिले जातील.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी चिंचवड
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com