

पिंपरी, ता. २९ ः फिटनेस चाचणीसाठी (पासिंग) अर्ज करताना ‘व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणजेच‘व्हीएलटीडी’ नाही म्हणून अर्ज करता येत नाही. तर कधी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक नंबर प्लेट बसवूनही त्याची नोंद संकेतस्थळावर नाही म्हणून फिटनेस चाचणी होत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक रिक्षांची चाचणी खोळंबली असल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गुरुवार (ता. २९) पर्यंत सुमारे ५२ हजार ३२८ प्रवासी वाहतूक रिक्षांची नोंद झाली आहे. नवीन रिक्षांना आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. तर आठ वर्षांवरील रिक्षाला दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. ती केल्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालकांना फिटनेस चाचणीसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन असल्याने पेमेंट होत नाही, तर कधी व्हीएलटीडी नाही म्हणून अर्ज जमा होत नाही. प्रवाशांची सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ‘व्हीएलटीडी’, ‘पॅनिक बटण’ आणि राष्ट्रीय परवाना प्राप्त मालवाहतूक आणि धोकादायक/रासायनिक मालाची वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ‘व्हीएलटीडी’ बसविण्याची सक्ती केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासून सुरू झाली आहे. राज्यातील तीनचाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना त्यामधून वगळण्यात आलेले आहे. मात्र, तरीही गेल्या काही दिवसांपासून रिक्षांची फिटनेस चाचणीचा अर्ज करताना ‘व्हीएलटीडी’ नाही म्हणून फिटनेस चाचणी होत नसल्याच्या तक्रारी रिक्षा चालकांनी केल्या आहेत.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक नंबर प्लेट बसवली आहे. मात्र त्याची नोंद संकेतस्थळावर झालेली नाही म्हणून रिक्षांची फिटनेस चाचणी होत नाही. गेल्या आठवड्यात ‘व्हीएलटीडी’ नाही म्हणून फिटनेस चाचणी होत नव्हती. रिक्षांना कधीपासून ‘व्हीएलटीडी’ बंधनकारक केले याचे उत्तर ‘आरटीओ’ प्रशासनाने द्यावे.
- बापू भावे, अध्यक्ष, रिक्षा फेडरेशन
गेल्या काही दिवसांपासून रिक्षांची फिटनेस चाचणी करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ‘आरटीओ’ प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
- बाबा कांबळे, संस्थापक, महाराष्ट्र रिक्षा पंचायत
फिटनेस चाचणीबाबत काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. पण, त्या संबंधित यंत्रणेला सांगून दूर केल्या आहेत.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड आरटीओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.