लुटमारीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांत भीती

लुटमारीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांत भीती
Published on: 

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ ः एका ड्रायफ्रूट विक्रेत्याला रस्त्यात अडवून, धारदार शस्त्राचा धाक दाखवत चार लाख रुपयांची रोकड लुटली. तसेच दुचाकीही जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना पिंपरी कॅम्प परिसरात २९ ऑक्टोबरला रात्री घडली होती. त्यामुळे कॅम्प भागातील व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.
पिंपरी कॅम्प ही शहरातील प्रमुख आणि गजबजलेली बाजारपेठ आहे. या परिसरात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, विविध प्रकारच्या वस्तू व उपकरणे विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, दिवसभराच्या व्यवसायानंतर दुकानातील रोकड घरी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक पाळत ठेवून त्यांना ‘लक्ष्य’ करण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच दुकानात शिरून हत्याराचा धाक दाखवून लूटमार केल्याचाही घटना घडल्या आहेत. यामुळे दिवसभर व्यवसाय करून जमा झालेली रोकड घरी घेऊन जाताना व्यापाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

गुन्हे रोखण्यासाठी काय करावे?
- गर्दीची ठिकाणे, अंतर्गत रस्ते आणि बाजारपेठेतील प्रवेशद्वारांवर पोलिसांची नियमित गस्त
- महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे गरजेचे
- घटना घडल्यानंतरच हालचाली करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज

व्यापाऱ्यांनी घ्यायची काळजी
- दिवसभरातील रोकड दुकानात उघडपणे ठेवू नये
- शक्यतो डिजिटल व्यवहारासही प्राधान्य द्यावे
- रात्री दुकान बंद केल्यानंतर एकट्याने जाणे टाळावे
- रोकड घेऊन जाताना सुरक्षित मार्गाचा वापर करावा
- दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
- संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी
- दुकानातील सुरक्षेसाठी अलार्म आणि इतर सुरक्षा यंत्रणा वापराव्यात
हेल्पलाइन क्रमांक ः ११२

‘‘पिंपरी बाजारपेठेतील पोलिसांची गस्त पूर्वीसारखी राहिलेली नाही. पोलिसांचा वचक नसल्याने या परिसरात गुन्हेगारी घटना घडत आहेत. रात्री दहाच्या सुमारास सर्वच हॉटेल बंद होणे आवश्यक असताना काही भागांतील हॉटेल मात्र रात्रभर सुरू असतात. येथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या संख्येने जमतात. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली आहे.
- हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, माजी उपमहापौर, पिंपरी चिंचवड

‘‘पिंपरी बाजारपेठ परिसरात दिवस-रात्र पोलिस तैनात असतात. स्थानिक पोलिस ठाण्याचे बीट मार्शल तसेच गुन्हे शाखेचे साध्या वेशातील कर्मचारीदेखील सतत गस्त घालत असतात. काही ठिकाणी फिक्स पॉइंटही नेमले आहेत. व्यापारी अथवा ग्राहकांना परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना कळवावे, तत्काळ आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल.
- संदीप आटोळे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.