

निगडी, ता.२३ ः मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने तळवडे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील भाताच्या रोपाची वाढ नाही; तर इतर पेरणीची कामे रखडली असून शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.
जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतजमिनी कोरड्याच आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. या भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी बियाणे शेतात टाकली आहेत. मोटार पंपाने पाणी दिले जात आहे. पण, पाऊस नसल्याने रोपे योग्य प्रमाणात येणार नाहीत. तर उगवणाऱ्या रोपाचे शेंडे पक्षी खात असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. त्यामुळे भाताचे मुख्य पीक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर पडली आहे. सोयाबीन, बाजरी, मका व इतर खरीप पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक ओलावा नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. पावसाचा खंड वाढल्यास बियाणे व खतांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकरी विलास भालेकर म्हणाले,‘‘मशागतीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणी करता आलेली नाही. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.