रस्ते विकासाला वाहतूक, वर्दळीचा ‘गतिरोधक’

रस्ते विकासाला वाहतूक, वर्दळीचा ‘गतिरोधक’
Published on

पिंपरी, ता. ११ : चाकण-आळंदी औद्योगिक क्षेत्रातील रस्‍ते सुधारणा व अन्‍य विकासकामांसाठी वाहतूक आणि सततच्या वर्दळीमुळे अडथळा येत आहे. ‘पीएमआरडीए’ने या परिसरात सहा रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. तत्‍पूर्वी या मार्गासाठी पर्यायी मार्गाची ठोस अंमलबाजवणी होत नसल्‍याने कामांना गती मिळत नसल्‍याचे समोर आले आहे. या परिसरात नियोजनासाठी ७० वॉर्डन मिळावेत, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे.

या विकास कामांमध्ये रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचा समावेश आहे. कामांच्या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडे देण्यात आला आहे. ती कामे डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहतील. दरम्‍यान, या कामांची नुकतीच वाहतूक पोलिस, ‘पीएमआरडीए’ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र, समस्यांवर तूर्त तोडगा निघालेला नाही.

मार्ग अंतर आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी
चिखली-मोई (१,३०० मीटर) : ३० नोव्हेंबर
कुरुळी फाटा-निघोजे (१,९०० मीटर) : ३० डिसेंबर
खालुंब्रे-हुंदाई कंपनी (१,३०० मीटर) : १० डिसेंबर
निघोजे गावठाण ते एमआयडीसी (फेज-३) : १० डिसेंबर
चाकण फाटा ते आळंदी (८,००० मीटर) : ३० डिसेंबर
आळंदी मरकळ ते चहोलीमार्गे (२,००० मीटर) : तातडीने

पर्यायी रस्‍ते : कुरुळी फाटा-निघोजे मार्गासाठी एमआयडीसी फेज-३ मार्ग, खालुंब्रे रस्‍त्‍यासाठी तसेच सावरदरी रस्ता अथवा एचपी चौकमार्गे तळेगाव-चाकण रस्‍ता, चाकण फाट ते आळंदी माार्गसाठी आळंदी बाह्यवळण रस्ता, चिंबळी आणि पुणे-नाशिक रस्त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.

‘पीएमआरडीए’ भूमिका
या रस्‍त्‍याच्‍या कामासंदर्भात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे पाठवला आहे. त्‍याची अंमलबजावणी करण्‍याची मागणी केली आहे. ती झाल्‍यास कामे लवकर मार्गी लागतील. त्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे देखील पाठपुरावा सुरू असल्‍याचे सांगितले जात आहे.

वाहतूक पोलिसांची भूमिका
‘पीएमआरडीए’कडून सुरू असलेल्‍या कामांची पाहणी केली आहे. मोई गावालगत कामे सुरू असल्‍याने तसे नियोजन केले आहे. मात्र, त्‍या कामात सातत्‍य हवे. त्‍या अनुषंगाने नियोजन करता येईल. वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्‍याने आवश्‍यक मनुष्‍यबळ नाही. त्‍यासाठी ७० वॉर्डन मिळावेत. केवळ चाकणच नव्‍हे, तर आळंदी, चिखली, म्‍हाळुंगे, दिघी हा देखील विभाग मोडत असल्‍याने त्‍या अनुषंगाने नियोजन करणे आवश्‍यक आहे. संबंधित कंत्राटदाराने याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.


रस्‍त्‍यांच्‍या कामासंबंधीच वाहतुकीचे सर्व नियोजन केले आहे. त्‍यापैकी चिखली ते मोई गाव यादरम्‍यान वाहतुकीत बदल केले आहेत. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्‍या मोठ्या प्रमाणात असल्‍याने आणखी मनुष्‍यबळाची गरज आहे. तसे, वरिष्‍ठांना कळवले आहे.
- नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक (वाहतूक)

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहा महत्त्वाच्या रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये आणि कामाला गती मिळावी, यासाठी आवश्यक मार्गांवर एकेरी वाहतुकीचे नियोजन सुचविले आहे. त्‍याबाबत नियोजन व्‍हावे.
- शिवकुमार कुपल, कार्यकारी अभियंता, ‘पीएमआरडीए’


PNE26W48877

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com