
नवीन ट्रान्सफॉर्मरला मुहूर्त कधी?
पवनानगर, ता. ४ ः ठाकूरसाई येथील विद्युत रोहित्र क्षमता वाढविण्याची मागणी अनेक वेळा केली असून याबाबत गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंजूर झालेल्या कामाला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
ठाकूरसाई येथील विद्युत रोहित्रावरून तिकोना ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला कनेक्शन देण्यात आलेले आहे. परंतु या विद्युत रोहित्रावर अतिरिक्त भार येत असल्याने तिकोना येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने चालत नाही. तसेच यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे ग्रामस्थांनी या विद्युत रोहित्राची क्षमता वाढविण्यासाठी महावितरण कार्यालयात मागणी केली होती. पाठपुरावा केल्यानंतर डीपीडिसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामाचा मंजुरी आदेश निघाला असून काम करण्यासाठी ठेकेदारही नेमला आहे, तरी देखील काम न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरू झाल्यावर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे लवकरात लवकर महावितरण कार्यालयाने याबाबत संबंधित ठेकेदाराकडून काम करून घ्यावे. अन्यथा ऐन पावसाळ्यात गैरसोयीचा सामना तिकोना व ठाकूरसाई येथील ग्रामस्थांना करावा लागेल. ठाकूरसाई येथील विद्युत रोहित्राची क्षमता कमी असल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत.
‘‘महावितरण कार्यालयात अनेक वेळा जाऊन चौकशी केली आहे. परंतु अजूनही याबाबत नागरिकांची गैरसोय दूर झाली नाही. येत्या आठवडाभरात ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
- नारायण बोडके, सरपंच (ठाकूरसाई, गेव्हंडे)
‘‘या ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाला आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर काम पूर्ण होईल.’’
- विशाल जाधव, शाखाधिकारी, पवनानगर