रावेत येथे धुळीमुळे नागरिक त्रस्त

रावेत येथे धुळीमुळे नागरिक त्रस्त

Published on

रावेत, ता. १७ ः रावेत येथील म्हस्के वस्ती परिसरात माती वाहतूक, रस्त्याची कामे, वाहतूक कोंडी आणि वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांमुळे सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग आणि दम्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेने नियमित पाणी फवारणी करून धूळ नियंत्रणात आणावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असताना संपर्क होऊ शकला नाही.

रोज सकाळी बाहेर पडताच नाकात आणि तोंडात धूळ जाते. मुलांना शाळेला पाठवताना काळजी वाटते. रस्त्यांवर पाणी फवारणी होत नसल्याने त्रास वाढला आहे.
- संदीप गवळी, रहिवासी

आमच्या सोसायटीत ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. सतत धूळ श्वासात गेल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे. पालिकेने तातडीने पाणी फवारणी करावी.
- वर्षा पाटील, म्हस्के वस्ती

मागील दोन-तीन आठवड्यांपासून श्वसनासंबंधित रुग्ण वाढले आहेत. धूळ आणि प्रदूषण हे त्याचे प्रमुख कारण आहे. मुले आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. त्यामुळे तातडीने धूळ नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
- डॉ. अमोल जाधव, स्थानिक डॉक्टर

रस्त्यांवरील धुळीची कारणे :
टिपरद्वारा होणारी वाहतूक
रस्ते खोदकाम व विकासकामे
अपूर्ण डांबरीकरण
बांधकामामुळे उडणारी धूळ
पाणी फवारणीचा अभाव
अवजड वाहनांची वर्दळ

Marathi News Esakal
www.esakal.com