पवनेचे रसायनयुक्त पाणी आरोग्यासाठी घातक
रावेत, ता. २१ : पवना नदीतून शहरात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून, मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. औद्योगिक परिसरातून नदीत मिसळणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे पवनेचे पाणी अत्यंत दूषित होत आहे. यामुळे अनेकांना त्वचारोग, पोटाचे विकार, अतिसार, पाण्यातून पसरणारे संसर्ग होत आहेत. तर, लहानग्यांना पचनाचे त्रास होत आहेत.
शहरातील लोकसंख्या वाढ, वाढती मागणी, दिवसाआड पुरवठा, अनधिकृत जोडण्या, पाइपलाइनमधील गळती आणि शुद्धीकरणातील त्रुटी या सर्व समस्यांमुळे नागरिकांपर्यंत स्वच्छ, सुरक्षित पाणी पोहोचत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राबवावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. या प्रकल्पासाठी प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने आर्थिक मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील वाढते प्रदूषण, सुरक्षित पाण्याचा प्रश्न आणि जलस्रोतांवरील ताण या तीनही गंभीर आव्हानांचा दीर्घकालीन तोडगा म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात बंद जलवाहिनी प्रकल्पाला प्राधान्य देणे अपरिहार्य आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
प्रदूषण नियंत्रणात त्रुटी
उद्योगांचे सांडपाणी नदीत मिसळण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होते. मात्र, नदीत सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्याचे प्रमाण पाहता, हे प्रदूषण वाढतच आहे. पाणीशुद्धीकरण केंद्रांची क्षमता मर्यादित असल्याचेही चित्र आहे.
सध्या रावेत, किवळे, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड या भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींनी भर पडत आहे. अनेक समाजसंस्था आणि नागरिकांनी पालिका व शासनाकडे प्रकल्पाला गती देण्याचे निवेदन दिले असून आता आम्ही कर भरतो पण आरोग्याच्या बदल्यात दूषित पाणी पिण्याची वेळ येते.
- सचिन सिद्धे, स्थानिक रहिवासी, रावेत
बंद नलिकेद्वारे पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला, तर पवना नदीतून येणारे पाणी थेट बंद पाइपद्वारे शुद्धीकरण केंद्रात जाईल. त्यामुळे नदीतील केमिकल, कचरा, गाळ, तसेच प्रदूषित पाण्याशी होणारा संपर्क पूर्णपणे तुटेल. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारू शकते.
- गणेश बोरा, पर्यावरणप्रेमी

