

रावेत, ता. ११ : रावेत परिसरात पुणे-मुंबई द्रूतगतीला लागून असलेल्या सेवा रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे खोदकाम करून अनेक दिवस झाले असले तरी त्यानंतरचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटचे काम रखडलेले आहे. अरुंद रस्ता, मातीचे ढीग, खड्डे आणि अडथळे यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे.
रावेत, किवळे, मामुर्डी आणि आसपासच्या वस्तीतील नागरिक दररोज या सेवा रस्त्यावरुन प्रवास करतात. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी परतीच्यावेळी येथे वाहनांची मोठी गर्दी होते. खोदलेल्या रस्त्यावरून वाहने हळूहळू जात असल्याने मागे लांबच लांब रांगा लागतात. दुचाकीस्वारांना तोल सांभाळणे कठीण जात असून अपघाताचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्याचे काम सुरू आहे. हे आम्हाला मान्य आहे, पण अर्धवट खोदून तसेच सोडणे चुकीचे आहे. रोज ऑफिसला जाताना किमान वीस ते तीस मिनिटे याच ठिकाणी अडकतो. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी वाईट होईल.
- अमोल पवार, रहिवासी
रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि माती असल्याने वाहन चालवताना भीती वाटते. लहान मुलांना शाळेत सोडताना फार त्रास होतो. प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे.
- प्रिया देशमुख, वाहनचालक
सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच डांबरीकरण केले जाईल.
- सुभाष घंटे, कार्यकारी अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
नागरिकांचे म्हणणे...
- संबंधित ठेकेदारांकडून योग्य सूचना फलक, बॅरिकेड्सचा अभाव
- वाहतूक नियोजन नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर
- रात्रीच्यावेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका
- संबंधित प्रशासन, प्राधिकरणाने तातडीने लक्ष घालून सेवा रस्त्याचे काम पूर्ण करावे
- तोपर्यंत वाहतुकीसाठी सुरक्षित आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी
- त्रास थांबवण्यासाठी ठोस आणि तत्काळ उपाययोजना कराव्यात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.