सीसीटीव्ही कॅमेरे बंद; मात्र सोनसाखळी चोरटे बेबंद
संदीप सोनार ः सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता.२८ : लाखो रुपये खर्चून काळेवाडी व रहाटणी परिसरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सोनसाखळी चोरीच्या प्रयत्नामधून महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे धडे न घेता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती किंवा नवीन बसविण्यासाठी कोणतीही उपाय योजना न केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालये व शहरातील परिसरात सुरक्षा उपाय योजनांचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने जागोजागी लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमरे बसविले. परंतु काळेवाडी व रहाटणी परिसरातील विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्याने पोलिस प्रशासनास आरोपी व सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काळेवाडी येथील संत निरंकारी सत्संग रोड तसेच विजयनगर परिसरात काही दिवसांपूर्वी रस्त्यावरी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा चोरांनी प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न महिलेच्या सावधानतेमुळे फसला. सत्संग रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर हा प्रकार घडूनही तेथील कॅमेरा बंद असल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास अथवा ओळख पटविण्यात त्या कॅमेऱ्याची मदत झाली नाही.
कॅमेरे दुरुस्तीची मागणी
काळेवाडी परिसरातील अनेक ठिकाणे संवेदनशील असून त्यात भारत माता चौक, काळेवाडीतील तापकीर चौक, बीआरटीएस रोड व विजयनगरचा मोठ्या परिसराचा समावेश आहे. मात्र या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनास याविषयी कळवूनही कोणत्याही प्रकारचे दुरुस्ती किंवा नवीन कॅमेरे लावण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. नादुरुस्त कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस प्रशासन चोरांचा छडा नक्की कसा लावणार ? व त्याविषयी माहिती कशी घेणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त केले जावेत, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
काळेवाडी परिसरात अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. हे कॅमेरे सुरू असल्यास परिसरातील घटनांबाबत तपास करण्यात पोलिस प्रशासनास मदत होते. परंतु नादुरुस्त कॅमेऱ्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याविषयी महानगरपालिका प्रशासनास त्यांची दुरुस्ती अथवा नवीन कॅमेरे बसवण्यासाठी कळविण्यात आले आहे.
- अशोक कडलग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी पोलिस ठाणे
काळेवाडी परिसरातील विविध ठिकाणी असणारे कॅमेरे बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्या संदर्भात कोणत्या ठिकाणी कॅमेरे बंद आहे. त्याविषयी संबंधित विभागाला कळवण्यात येईल. लवकरात लवकर बंद कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल
- निवेदिता घार्गे, क्षेत्रीय अधिकारी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
काळेवाडी परिसरात काही महिन्यांपूर्वी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न चोरांनी केला होता. पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. परंतु कॅमेऱ्यात तेथील घटना रेकॉर्ड न झाल्याने लावलेले कॅमेरे निष्प्रभ ठरले असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील अनेक ठिकाणी ही समस्या असून प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे
- मनोज सुर्वे, रहिवासी, काळेवाडी
काळेवाडी परिसरात दुचाकी चोरीच्या व इतर घटना वाढल्या आहेत. त्यासाठी परिसरात नव्याने कॅमेरे लावण्यात यावे. जेथे कॅमेरे नादुरुस्त आहेत. त्या ठिकाणी नवीन कॅमेरे लावण्यात यावेत.
- खुशांत वाघ, नागरिक, काळेवाडी
PNE25V27018
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.