अंतर्गत रस्ते पेव्हिंग ब्लॉकने दोलायमान
काळेवाडी, ता. ९ : काळेवाडीमधील ज्योतिबानगर येथे अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण न करता संपूर्ण रस्तेच पेव्हिंग ब्लॉकने तयार करण्यात आले आहेत. सध्या हे रस्ते खचून खाली वर झाले असून पेव्हिंग ब्लॉकही निखळले आहेत. त्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून रस्ते बांधणीसाठी पेव्हिंग ब्लॉक बसविल्याने वाहनांच्या वजनाने ते खाली वर होत आहेत. ब्लॉक निखळल्याने दुचाकी चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निखळलेल्या पेव्हिंग ब्लॉकची वारंवार दुरुस्ती करण्याऐवजी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करून रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
ठेकेदारांना पोसण्याचा प्रयत्न ?
काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांमध्ये हजारो पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात आले आहेत. एका पेव्हिंग ब्लॉकसाठी जवळपास ३५ ते ४० रुपये व त्यापेक्षाही जास्त खर्च येतो. परंतु डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे सोडून महापालिका प्रशासनाने पेव्हिंग ब्लॉक टाकले आहेत. ठेकेदारांना देखभालीचा खर्चामधून कायमचे पोसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सध्या पावसाळा असल्याने डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करता येणार नाही. परंतु या रस्त्याचे पाहणी करून लवकरच कायमस्वरूपी पक्के रस्ते कसे केले जातील ? याविषयी वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल.
- हेमंत देसाई, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय
अंतर्गत रस्ते करताना महापालिकेने निवासी भागांत पेव्हिंग ब्लॉक टाकून जणू अपघाताना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे वाहन घरून अपघात होत आहेत. रस्ता म्हटला की तो डांबरी किंवा सिमेंट काँक्रिटचा हवा.
- दुर्वेश लांडगे, रहिवासी
जवळपास चार वर्षे झाली हा त्रास असून रस्त्यांवर वारंवार पेव्हिंग ब्लॉक काढून बसविण्यात येत आहेत. त्यामुळे हा नाहक खर्च जनतेच्या खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.
- निशांत जाधव, रहिवासी
SVW25A00102