डॉक्टरांकडून व्यावसायिक सीमारेषेचे उल्लंघन

डॉक्टरांकडून व्यावसायिक सीमारेषेचे उल्लंघन

Published on

काळेवाडी, ता.१६ : अनेक डॉक्टर हे व्यावसायिक सीमारेषा विसरून केवळ आर्थिक फायद्यासाठी औषधे निर्मिती कंपन्यांना हाताशी धरून रुग्णांना परस्पर औषध विक्री करण्याकडे वळू लागले आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारकडे आपले परवाने परत करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. रुग्णहित, व्यावसायिक नीतिमत्ता जपण्यासाठी राज्य शासनाने दखल घेत त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने केली आहे.
डॉक्टरांकडून होत असलेल्या औषधे विक्रीचा औषधे व्यवसायावर होणारा परिणाम मोठा आहे. हा वैद्यकीय व्यवसायाचा आणि आरोग्य व्यवस्थेच्या तत्वांचा अपमान आहे. मोठ्या प्रमाणात शुल्क भरून औषधे निर्मिती (फार्मसी) अभ्यासक्रम करणाऱ्या अथवा येऊ पाहणाऱ्या व असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य काय ? औषधे निर्मिती विभाग आणि संपूर्ण औषधे व्यवसाय अस्तित्वात ठेवण्याची आवश्यकता का ? असे प्रश्न असोसिएशनने उपस्थित केले आहेत.


अनेक डॉक्टरांना औषधांमधील अनेक गोष्टी व कंपन्यांच्या संदर्भातील माहिती नसते. डॉक्टर हे निदान व उपचार करतात. औषधांची नावे व त्यातील कंटेंट हे डॉक्टर देत असतात. परंतु कोणती औषधे कोणत्या कंपनीची आहेत. हे मात्र, डॉक्टरांना माहित नसते. त्यामुळे डॉक्टरांनी उपचार करावेत. औषधे देऊ नयेत.
- विवेक तापकीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट

एखाद्या रुग्णालयात फॅमिली फिजिशियनला थेट रुग्णाला औषधे देता येत नाहीत. तसेच खासगी वैद्यकीय व औषधे विक्रेते यांनीही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व लिहून दिले गेल्याशिवाय औषधे देऊ नये हे नियम आहेत. हे नियम औषधे विक्रेते पाळत नाहीत.
- डॉ. प्रमोद लोहार, मीडिया समन्वयक, देहू मेडिकल असोसिएशन

जी शेड्यूल क्रमवारीतील औषधे आहेत. एच, एच - १, एक्स यातील ती डॉक्टरांच्या सल्ला व दिलेल्या उपचारांनुसार पेपरवर लिहून दिल्यावरच देणे औषधे दुकानांना बंधनकारक आहे. तर ओटीसी क्रमवारीमधील औषधांची थेट विक्री केली व दिली जातात. अशा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
- गिरीश हुक्रे, सहआयुक्त, औषधे, अन्न व औषध प्रशासन, पुणे

Marathi News Esakal
www.esakal.com