हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥

Published on

संदीप सोनार ः सकाळ वृत्तसेवा

काळेवाडी, ता.५ : हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीमध्ये वाड्‍मयरुपी परब्रह्माचे वर्णन केले आहे. त्या परब्रह्म आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होत काळेवाडीतील गणपती रेवण्णा पांचाळ (वय ७६) यांनी सलग १६ महिने स्व: हस्ताक्षरात सार्थ ज्ञानेश्वरीचे लिखाण करण्याचे अनोखे कार्य सिद्धीस नेले आहे.
काळेवाडी येथील विजयनगरच्या मोरया कॉलनीमध्ये पांचाळ हे वास्तव्यास आहेत. सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील एकंबा या छोट्याशा गावातून शिक्षणाच्या ओढीने त्यांनी १९६८ मध्ये पिंपरी चिंचवड गाठले. परंतु घरची जबाबदारी व स्वतःचे शिक्षण या दुहेरी जबाबदारीमुळे त्यांनी कमी वयातच एका खासगी कंपनीत नोकरी केली. काही वर्षांनी ती खासगी कंपनी बंद पडली. पण, ते खचून गेले नाहीत. त्यातूनच त्यांनी काळेवाडी येथील परिसरात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त, गरीब रहिवासी आणि शहराकडे स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या मुलांसाठी मराठवाडा मित्र मंडळाच्या प्राथमिक संस्थापक सदस्य होत लहान मुलांसाठी बालवाडी सुरू केली.
खासगी सावकारांकडून जादा व्याजदराने सामान्य जनता पैसे घेत असल्याचे पाहून त्यांनी काही विश्वासातील लोकांना एकत्र जमवून महिन्यासाठी पाच रुपये जमा करून बचत करत सदस्यांना कमी व्याजदर अर्थसाहाय्य देण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून त्यांनी परिसरात तुळजाभवानी मंदिर स्थापन केले. त्या ठिकाणी आपल्या मुलींना भजन-कीर्तनाची गोडी लावत व स्वतः तबलावादनाची साथ देत लोकांना भक्ती मार्ग दाखवला. विविध मंदिरांमध्ये भजन-कीर्तन सेवा करत असताना चिंचवड येथील भुलेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक दत्ता चिंचवडे यांनी ‘ज्ञानेश्वरी घरोघरी’ या उपक्रमा अंतर्गत त्यांच्याकडे सार्थ ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखिताचे लिखाण करण्यासाठी आग्रह धरला. एक चांगले कार्य आपल्या हातून घडत आहे, ही भावना ठेवत पांचाळ यांनीही आपल्या दैनंदिन कामातील जास्तीत जास्त वेळ काढला. तसेच जवळपास ३८६ पानांमध्ये सुंदर मांडणी करत त्यांनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केले.

एखादा व्यक्तीच्या हातून चांगली गोष्ट घडून येत असते. त्याचा प्रत्यय मला सार्थ ज्ञानेश्वरीच्या स्वहस्ताक्षरातील लिखाणातून आला. ही स्वहस्ताक्षरातील ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचावी. तिच्यापासून प्रेरणा घेऊन तरुणांनी वारकरी संप्रदाय व भक्तिमार्ग पुढे नेण्यासाठी कार्य करावे. तरच अशा उपक्रमांचा हेतू साध्य होईल.
- गणपती पांचाळ, लेखक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com