काळेवाडी, रहाटणी भागांत विशेष स्वच्छता मोहीम
काळेवाडी, ता. १० : काळेवाडी, रहाटणी भागांत ‘ब’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबाबत आरोग्य विभागाकडून एकूण १५३ जणांवर कारवाई करत ८२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरोग्य विभागाकडून गल्लोगल्ली घंटागाडीची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. मात्र काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःची जबाबदारी न ओळखता कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून येत आहे. त्याची दखल घेत वरील मोहीम राबविली जात आहे. त्यात नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास किंवा घाण, अस्वच्छता करताना दिसताच जागेवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
या मोहिमे अंतर्गत प्रभाग क्रमांक २७ येथील रहाटणी, श्रीनगर, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा, तांबे रोड इत्यादी परिसरात बेजबाबदार नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुंडलिक दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक गणेश राजगे, आरोग्य मुकादम आबा कदम, अरुण राऊत, प्रदीप जगताप, सुधीर वायदंडे, गणेश कार्ले,
यश लोंढे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. ‘कचराकुंडी विरहित प्रभाग’ या संकल्पनेच्या माध्यमातून महापालिकेने नागरिकांनी कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन केले आहे.
आपले शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची आहे. दंडात्मक कारवाईतून स्वच्छतेचा संदेश जावा ही अपेक्षा असून नागरिकांना त्रास देणे हा नाही. हे नागरिकांनी समजून घ्यावे.
- गणेश राजगे, आरोग्य निरीक्षक ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय

