किरतन महोत्सव

किरतन महोत्सव

कामशेतमध्ये फुलला ‘विठ्ठल’भक्तीचा मळा

कीर्तन महोत्सवास मोठा प्रतिसाद; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

तळेगाव दाभाडे ः टाळ मृदंगाचा गजर... विठुनामाचा जयघोष...अशा भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल परिवार मावळच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवास तालुक्यातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कीर्तन हादेखील मराठी मातीत रुजलेला एक दमदार लोककलाप्रकार. रंजनाबरोबरच प्रबोधनाचीही ताकद या कलाप्रकारात आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने कामशेतमध्ये आयोजित केलेल्या महोत्सवास पहिल्याच दिवसापासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. परमार्थामध्ये साक्षात्कार होण्यासाठी चिंतन लागते, प्रतीक्षा लागते आणि मग प्राप्ती होते, तर जन्मास आलेल्या जीवाने स्वत:ची नेमकी ओळख करून घेणे, प्राप्त झालेल्या नरजन्माची सार्थकता साधणे, मोक्ष अन्‌ निज कल्याणाचा जो मार्ग तो कोणता हे जाणून घेणे म्हणजे परमार्थ. आपण आपला संसार, प्रपंच हा मोठ्या आवडीने करीत असतो. त्या आवडीमुळेच आपल्याला परमार्थ साधायला सवड मिळत नाही. कारण जर तुम्हास परमार्थ साधायचा असेल तर तुम्हाला तुमच्या संसार प्रपंच्यात रमणारे मन हे विवेकाने आवरावे लागते. त्याचा ईश्‍वर नामाची आवड लावावी लागते. ती आवड जर लावण्यात आणि लावून घेण्यात आपण यशस्वी झालो, तर आपल्याला तो स्वानंद, सुखाचा परमार्थ जोडता येतो. असे नानाविध संदेश कीर्तन सेवेच्या माध्यमातून श्री विठ्ठल परिवार आयोजित कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून कीर्तनकारांनी दिले. या सप्ताहात एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (पारनेर), विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), बाळू महाराज गिरगावकर (परभणी), योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांची कीर्तने झाली. तर अक्रुर महाराज साखरे (बीड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी मावळ तालुक्यातून हरिभक्त, श्रोते, वारकरी, माळकरी, लहान-थोरांची उपस्थिती अन् टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड घोष, मावळातील गुलाबी थंडीत देहभान विसरून नाचणारे वारकरी अशा भक्तिरसात चिंब झालेले भक्तगण, देहभान विसरून या कीर्तन महोत्सवात लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि अशा वातावरणात कामशेत येथील श्री विठ्ठल परिवार मावळ सप्ताह मैदानाला जणू आळंदी, पंढरपूरचे स्वरूप आले आहे. येथील सप्ताहात भाविक भक्तिरसात चिंब होऊन कीर्तनाच्या रंगात देहभान विसरून नाचताना पाहायला मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com