मावळात ‘नकोशी’ची गर्भातच हत्या

मावळात ‘नकोशी’ची गर्भातच हत्या

विजय सुराणा
तळेगाव दाभाडे, ता.२९ ः मावळ तालुक्यात बेकायदा गर्भलिंग तपासणीचा धंदा तेजीत असून काही डॉक्टर तीस ते पस्तीस हजार रूपये उकळून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करत आहेत. काही वर्षांत भरारी पथकाची कारवाई थंडावल्याने मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट झाल्याचे दिसून येत आहे. दर हजारी मुलींचे प्रमाण तब्बल ११८ ने घटून ८८२ इतके खाली आले आहे. केंद्र शासनाची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा कागदावरच राहिली आहे.

३८ सोनोग्राफी आणि २० गर्भपात केंद्रे कार्यरत
तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून एक उपजिल्हा रुग्णालय आहे. तर दोन ग्रामीण रूग्णालये आहेत. मावळ तालुक्यात कान्हे रूग्णालयात अंतर्गत वडगाव, तळेगाव दाभाडे येत असून या ठिकाणी २० सोनोग्राफी केंद्रे आहेत; तर नऊ गर्भपात केंद्रे आहेत. पवनानगर ग्रामीण रूग्णालया अंतर्गत कामशेत, सोमाटणे, देहूरोड, देहूगाव येथे ११ सोनोग्राफी केंद्रे तर तेवढीच गर्भपात केंद्रे आहेत. लोणावळा येथे ७ सोनोग्राफी केंद्रे असून तालुक्यात एकूण ३८ सोनोग्राफी तर २० गर्भपात केंद्रे कार्यरत आहेत.

मुलींच्या जन्मदरातील घट चिंताजनक
तालुक्यात काही वर्षांपासून मुलगा की मुलगी हे तपासण्यासाठी काही डॉक्टर ३० ते ३५ हजार रूपये घेऊन सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत आहेत. २०१० ते २० या वर्षात दर हजारी ९३० इतका मुलींचा जन्मदर होता. तो २०२३-२४ ला दर हजारी ८८२ इतका घसरला असून मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली आहे.

वर्ष मुले मुली एकूण दर हजारी मुलींचे प्रमाण
२०१९-२०, २०७२, १९२६ , ३९९८ ९३०

२०२०-२१, २१६२, १९२०, ४०८२, ८८८

२०२१-२२, २२९५, २११८, ४४१३ ९२३

२०२२-२०२३, २१०८, १९३२, ४०४० ९१७

२०२३-२४, २०३१, १७९०, ३८२१, ८८२

लेक लाडकी योजनेला कमी प्रतिसाद
राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून मुलगी जन्माला आली की ५ हजार रुपये, पहिलीत गेली की ६ हजार, सहावीत ७ हजार, ११ वीमध्ये ८ हजार आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की ७५ हजार असे एकूण १ लाख १ हजार रुपये लाभार्थ्याला दिले जातात. परंतु, तालुक्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्याही कमी असून १ एप्रिल २०२३ पर्यंत २३० लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.
- विशाल कोतागडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी

संसदेने स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठी कायदा लागू केला आहे. प्रसूतीपूर्व व गर्भधारणापूर्व लिंग तपासणी तंत्राच्या गैरवापरास पूर्ण बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन करून लिंगनिदान व स्त्रीभूण हत्येबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सखोल चौकशी करून संबंधित सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रावर सुधारित कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी एका सोनोग्राफी केंद्रावर कारवाई केली असून त्याचा खटला न्यायालयात चालू आहे.
- डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय, वडगाव मावळ (कान्हे)

दर तीन महिन्यांनी जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाते. जर कोणी पैसे घेऊन बेकायदेशीर सोनोग्राफी करीत असेल; तर आम्हाला माहिती द्या. तक्रार आल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाईल. 
- डॉ. नागनाथ येलपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रूग्णालय, औंध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com