गावोगावच्या पैजा अन् पैशांच्या पावसाची चर्चा !

गावोगावच्या पैजा अन् पैशांच्या पावसाची चर्चा !

तळेगाव दाभाडे, ता.१५ ः  मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार मतांची आघाडी घेईल ? कोण निवडून येईल ? याबाबत आता आकडेमोड सुरू झाली असून हजारो रूपयांच्या पैजा लागल्या आहेत. तसेच आगामी निवडणुकांतील इच्छुकांनी मतदानाच्या आधी व मतदानाच्या दिवशी गावोगावी पैशांचा पाऊस पाडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात प्रमुख लढत होती. मावळ लोकसभा मतदारसंघाचा मोठा विस्तार असल्याने उमेदवार प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे, उमेदवारांची कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भिस्त होती.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या शिवसेनेची ताकद फारशी नाही. मात्र, महायुती झाल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बरोबर असल्याने बारणे यांची बाजू भक्कम झाली आहे. त्यांच्याबाजूला आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते होते. तर महाविकास आघाडीकडे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, माजी मंत्री मदन बाफना, चंद्रकांत सातकर यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते होते. जुन्या जाणत्या नेत्यांमुळे वाघेरे यांची देखील बाजू भक्कम झाली होती. 

गावोगावी पडला पैशाचा पाऊस ?
मावळ तालुक्यात लोकसभा निवडणुकीत आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपल्यापरीने मोर्चेबांधणी केलेली दिसून आली. या निवडणुकीत मतदानाच्या आधी व मतदानाच्या दिवशी गावोगावी पैशांचा मोठा पाऊस पडल्याची चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकांतील इच्छुकांनी आपल्या प्रभागात मताला ५०० रूपयांपासून २ हजार रुपये इतके पैशांचे वाटप केल्याचे बोलले जात आहे.

हजारो रुपयांच्या पैजा 
मावळ विधानसभा मतदारसंघात कोण जास्त मतांची आघाडी घेईल ? या निवडणुकीत विजयी कोण होणार ? याची उत्सुकता वाढली असून महाविकास आघाडी व महायुतीच्या अशा दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांनी आम्हीच जादा मताधिक्याने विजयी होणार असा दावा केला आहे. याबाबत हजारो रूपयांच्या पैजा लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com