तीनशे ग्राहकांची ५० कोटींची फसवणूक

तीनशे ग्राहकांची ५० कोटींची फसवणूक

तीनशे ग्राहकांची ५० कोटींची फसवणूक
मावळात दोन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे, ता. २३ : जांभूळ (ता. मावळ) येथील अतुल्य कॅलेक्स या गृहनिर्माण प्रकल्पात पिंपरी चिंचवड, पुणे शहर परिसरातील ३०० पेक्षा अधिक ग्राहकांची सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिकांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव सुनील सोमाणी (रा. बालाजी सोसायटी, बिबवेवाडी, पुणे), नितीन श्रीकिसन जाजू (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलेक्स स्पेसेस या कंपनीकडून डिसेंबर २०१८ मध्ये जांभूळ येथील अतुल्य कॅलेक्स या गृहनिर्माण प्रकल्पाची आकर्षक जाहिरात करण्यात आली होती. ‘प्रकल्पामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्याचे, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ, तसेच घराचा ताबा मिळेपर्यंत बँकेचा हप्ता द्यावा लागणार नाही,’ अशी जाहिरात विकसकांनी केली होती. त्यामुळे पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक मध्यमवर्गीय लोकांनी या प्रकल्पात सदनिकेची नोंदणी केली होती.
हा गृहनिर्माण प्रकल्प ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन विकसकांनी दिले होते. विविध बँकाद्वारे ग्राहकांची गृहकर्ज विकसकांनी मंजूर करून घेतली. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये वळवली. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्पावर बांधकाम पूर्ण केले नाही.
लॉकडाऊनचे कारण देत विकसकांनी ‘महारेरा’ यांच्याकडून ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रकल्पातील बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ घेतली होती. परंतु; त्यानंतरही प्रकल्पामध्ये कोणतेही काम पूर्ण केले नाही. प्रकल्पातील एकूण आठ इमारतींपैकी तीन इमारतींचे बांधकाम अर्धवट झाले आहे. उर्वरित पाच इमारतींचे बांधकाम अपूर्ण आहे. ग्राहकांना त्यांचे स्वप्नातले घर तर मिळाले नाहीच परंतु; त्यांना बँकेचे दर महिन्याचे हप्ते भरावे लागत आहेत. त्यामुळे सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन, विकासकांविरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ लेखनिक, पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांनी दिली.

‘‘वडगाव मावळ परिसरामध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्प चालू आहेत. अनेक वेळा विकसक आकर्षक जाहिराती देत असतात. परंतु ग्राहकांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून, प्रकल्पातील बांधकामाचा दर्जा, देण्यात येणाऱ्या सुविधा, बांधकामाची प्रगती याची खातरजमा करणे आवश्यक आहे.
- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, वडगाव मावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com