स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये पदग्रहण, शपथविधी सोहळा
तळेगाव दाभाडे, ता. १ ः श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण आणि शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे विश्वकर्मा चव्हाण, मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापिका रेणू शर्मा यांनी प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांना नेतृत्वाची संधी देणाऱ्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित शालेय विद्यार्थी प्रमुख विवेक ढेंगळे, सिया उमरिया तसेच विविध हाऊस प्रमुख व उपप्रमुख यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख शमिका केदारी आणि क्रीडा प्रमुख मिताली जयस्वाल यांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींनी शपथ घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पारदर्शक नेतृत्वाचा आदर्श घ्यावा असा संदेश दिला.