तळेगावात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात
तळेगाव दाभाडे, ता. १७ ः येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विठ्ठल मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे नेतृत्व नथुराम महाराज जगताप पाटील यांनी केले. पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन व कीर्तन सेवा असे कार्यक्रम पार पडले. यात श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन डॉ. यशोधन किसन महाराज साखरे यांनी केले, तर काल्याचे कीर्तन संपत महाराज सुरासे यांनी केले. त्यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी श्री विठ्ठल मंदिरापासून पालखीने ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या दिंडीत विणेकरी, भजनकरी, टाळकरी आदी सहभागी झाले. प्रदक्षिणेचा समारोप मंदिरात महाआरती करून करण्यात आला. श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे व विश्वस्त बाळकृष्ण आरडे, यतीन शहा, हरिदास वनारसे, देवराम महाराज खराटे, नारायण धामणकर, विलास गायकवाड, शेखर गुंड, प्रशांत दाभाडे, श्याम भेगडे, मुरलीधर ढेकणे, विलास नेवाळे, अरविंद हांडे पाटील, प्रकाश वालझाडे आदींनी नियोजन केले.