बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका
तळेगाव दाभाडे, ता. ११ : कामशेत-पवनानगर रस्त्यावरील बौर घाटात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून दररोज शेतकरी, दुग्धव्यवसायिक, विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र, सध्या पावसामुळे या मार्गावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
केदारेश्वर मंदिराजवळील डोंगरकड्यांवरून संततधार पावसामुळे दरड कोसळण्याचा आणि दगड-झाडे रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दगड रस्त्यावर पडले असले तरी, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्या दोन्ही कडांचे भाग ढिसूळ झाले असून, कधीही मोठा अपघात घडू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
‘‘बौर घाटात रात्रीअपरात्री दगड कोसळतात, तर झाडेही रस्त्यावर पडतात. त्यामुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.’’
- अतुल कालेकर, काले
‘‘संपूर्ण घाट परिसर पावसामुळे ढिसूळ झाला आहे. झाडे-दगड रस्त्यावर पडून नागरिकांना धोका आहे. वनविभाग व पीडब्ल्यूडी कानाडोळा करत आहेत. जीव गेल्यावरच उपाययोजना होणार का?’’
- दत्तात्रय काजळे, सामाजिक कार्यकर्ते, चिखलसे
‘‘बौर खिंडीत रस्त्यावर पडलेली झाडे काढण्याची कारवाई आमच्या विभागाकडून सुरू होती. मात्र, वनविभागाने अडथळा निर्माण केल्याने अडचण आली. रस्त्यावर पडलेले दगड आम्ही बाजूला करत आहोत. लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
- एस. दराडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग