पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी

Published on

मावळ तालुक्याला पहिल्यांदाच मिळण्याची संधी; विविध राजकीय पक्षांमधून मोठी संख्या

तळेगाव दाभाडे, ता. १६ ः पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक सोडत जाहीर झाल्याने मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग लागला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हे पद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्षांमधून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

मावळ तालुक्याला आतापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद मिळालेली नाही, त्यामुळे यावेळी हा मान मावळ तालुक्याला मिळेल, अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. या संदर्भात विविध पक्षांत उमेदवारांची निवड आणि प्रचार सुरू आहे, ज्यामुळे स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

जिल्हा परिषदेत यापूर्वी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून, १९९७ मध्ये दिवंगत दिलीप टाटिया यांना बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाले होते. त्यानंतर अतिष परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती झाले, तर बाबुराव वायकर कृषी समितीचे सभापती होते. मात्र, अध्यक्षपदाचा मान मावळ तालुक्याला अद्याप मिळालेला नाही.

राजकीय पक्ष आणि इच्छुकांनी यंदा गटनिहाय आरक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे. मावळ तालुक्यातील पाच प्रमुख गटांपैकी ‘टाकवे बु.-वडेश्वर’ गट अनुसूचित जातींसाठी राखीव असल्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. या गटातील २१.८८ टक्के लोकसंख्या अनुसूचित जातींची असून, या गटातील इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून सक्रिय मोर्चेबांधणी केली होती. मात्र, या गटात आरक्षणामुळे काही इच्छूक निराश झाले आहेत.

उर्वरित चार गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने तेथील इच्छुकांमध्ये स्पर्धा आणखी कठीण झाल्याचे दिसत आहे. काही इच्छुकांनी आरक्षणाचा विचार न करता प्रचारयात्रा सुरू केली आहे, तर काही उमेदवार खर्च वाचविण्याच्या हेतूने शांतता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राजकीय संघर्ष आणि गटांच्या आरक्षणावर येणाऱ्या काही दिवसांत सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मावळ तालुक्यासाठी हे पद मिळविणे महत्त्वाचे मानले जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com