ज्येष्ठ नागरिकाचे व्हॉट्सअप खाते हॅक

ज्येष्ठ नागरिकाचे व्हॉट्सअप खाते हॅक

Published on

तळेगाव दाभाडे, ता. १६ ः तळेगाव दाभाडे भागात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाच्या व्हॉट्सअप खात्याचा ताबा घेतलेली सायबर टोळी त्यांच्या मित्रपरिवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये सोशल मीडियावर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

मंगळवारी (ता. ९) दुपारी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या परिचित कलाकाराच्या नावाने व्हॉट्सअपवर ‘मला तुझी मदत हवी आहे’ असा मेसेज आला. चौकशी करताना सांगण्यात आले की, एका मित्राला १० हजार रुपये पाठवायचे आहेत. मात्र, त्याच्या खात्यातून पैसे जाऊ शकत नाहीत. मदतीच्या भावनेतून ज्येष्ठ नागरिकांनी पैसे पाठवले. यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांना पुन्हा एक मेसेज आला ज्यात ‘एक सहा आकडी कोड तुमच्या मोबाईलवर चुकून आला आहे, तो मला पाठवा’,असा उल्लेख होता. हा कोड प्रत्यक्षात त्यांच्या व्हॉट्सअप खात्याचा व्हेरिफिकेशन कोड असल्याने भोळेपणाने ते कोड दिल्यामुळे त्यांचे खाते हॅक झाले.
या हॅक झालेल्या खात्याच्या माध्यमातून सर्व संपर्कांना ‘मला तुझी मदत हवी आहे’ असे मेसेज पाठवून पैशांची मागणी केली गेली. या फसवणुकीतून एका परिचिताने पैसे देखील पाठवले आहेत.

बुधवारी (ता. १०) ज्येष्ठ नागरिकांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तळेगाव सायबर सेलच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली. त्या दिवशीच तक्रार तळेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, सायबर सेलच्या प्रयत्नांमुळे त्यांचे व्हॉट्सअप खाते परत मिळाले. या प्रकरणाने सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.

सायबर सेलने दिलेल्या सूचना
- सोशल मीडियावरून पैशांची मागणी केल्यास प्रत्यक्ष फोन करून खात्री करावी
- मोबाईलवर आलेला ओटीपी, सहा आकडी कोड किंवा पासवर्ड कधीही कोणालाही देऊ नये
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी खात्यावर पैसे पाठवू नयेत
- कोणत्याही संशयास्पद प्रकरणात तत्काळ सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com