अध्यक्षपद गेले, सदस्य होणेही हुकले
तळेगाव दाभाडे, ता. १३ : पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून मावळ तालुक्याला एकदाही अध्यक्षपद मिळालेले नाही. त्यामुळे यावेळी संधी मिळेल, या आशेने काही इच्छुकांनी नियोजन सुरू केले होते. मात्र, सोमवारी (ता.१३) सोडत होताच इच्छुकांच्या गटांत महिला आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे अध्यक्षपद बाजूलाच राहिले, पण सदस्य होणेही हुकल्याची स्थिती या इच्छुकांची झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील पाचपैकी तीन गटांत महिला आरक्षण पडले आहे. तर, एक गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित झाला. तर, एक गट सर्वसाधारण गटासाठी राहिला. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उमेदवारीची तयारी केलेल्या खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील अनेकांनी गेल्या दोन वर्षांपासून मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही घेतले. मात्र, आरक्षण सोडत होताच या नेत्यांनी मोबाइल फोनही बंद करून ठेवले आहेत.
उमेदवारीसाठी पक्षांतर, मात्र...
मावळ तालुक्यातील काही इच्छुकांनी गेल्या महिन्यात पक्षांतर केले. नव्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता आरक्षण जाहीर होताच दोन माजी सदस्यांना फटका बसला आहे. त्यांच्या मतदारसंघात महिला आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांची संधी हुकली आहे.
आता पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न
सोडतीमुळे निराशा झालेल्या खुल्या गटातील इच्छुकांपुढे आता पत्नीला उमेदवारी मिळवून घेण्याचा पर्याय उरला आहे. पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्यास एखादे सभापतिपद मिळू शकते, असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे आता काहींनी पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुक्यातील पाच गटांचे आरक्षण
टाकवे -वडेश्वर : अनुसूचित जमाती
इंदुरी-वराळे : सर्वसाधारण महिला
खडकाळे-कार्ला : सर्वसाधारण महिला
कुसगाव -काले : सर्वसाधारण
सोमाटणे - चांदखेड : सर्वसाधारण महिला