भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची नाराजी उफाळली

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची नाराजी उफाळली

Published on

तळेगाव नगरपालिका


विजय सुराणा ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. १८ : नगरपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा ‘फॉर्म्युला’ सुरळीत पार पडला, तरी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा ‘प्लॅन’ अपक्षांच्या बंडखोरीमुळे काहीसा कोलमडल्याची सद्यःस्थिती आहे. कारण, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. १८) नगराध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. अनेक प्रभागांत अपक्षांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दरम्यान, नगरसेवक पदाच्या तीन जागांवर प्रतिस्पर्धी नसल्याने बिनविरोध झाल्याची घोषणा बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीत नवीन ‘गुंता’ निर्माण झाला आहे.
नगराध्यक्षपदासाठी तब्बल पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी माघार न घेतल्यास निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार आहे. युतीचे संतोष दाभाडे यांनी उमेदवारी अर्ज भरताच नाराज गटातील किशोर भेगडे यांनी स्वतंत्र अर्ज दाखल थेट आव्हान दिले. सदस्य पदांबाबतही अशीच स्थिती आहे. बहुतांश ठिकाणी अपक्षांची वाढलेली संख्या महायुतीसमोर कठीण आव्हाने उभी करत आहे. दरम्यान, भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या गटातही प्रचंड नाराजी उफाळली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक रामदास काकडे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून तळेगाव नगरपरिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवण्याची रणनीती आखली होती. मात्र, त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल न घेता भाजपने राष्ट्रवादीसोबत युती करून अकरा जागांवर समाधान मानले. यामुळे हा गट संतप्त झाला असून, त्यांनी या निवडणुकीत अलिप्त राहण्याची घोषणा केली आहे. या नाराजीचा परिणाम म्हणून या गटाने नगराध्यक्षपदासाठी किशोर भेगडे यांना रिंगणात उतरवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे युतीसमोर अनपेक्षित आव्हान निर्माण झाले असून, निवडणुकीतील समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.
स्थानिक पातळीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे, आयात उमेदवारांना तिकीट देणे, नातेसंबंध जोपासण्यासाठी केलेले जागावाटप यामुळे दोन्ही पक्षांमध्ये असंतोष वाढला आहे. याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर दिसत असून, त्याचा थेट परिणाम अपक्ष बंडखोरांच्या वाढत्या संख्येत उमटला आहे. तळेगावातील ६४ हजार ६७८ मतदार हेच आता अंतिम निकालाचा निर्णय घेणार आहेत. याआधीच्या निवडणुकांमध्ये मतदान ५० ते ६५ टक्क्यांदरम्यान राहिले असले, तरी यंदा वाढलेली नाराजी व बंडखोरी लक्षात घेता मतदानातही वेगळीच रंगत दिसण्याची शक्यता आहे.
लोणावळा आणि वडगाव नगरपरिषदेत भाजप-राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे राहत असताना तळेगावात मात्र युती केली. ही विसंगतीही स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयानंतर युती घडली असली तरी नाराज कार्यकर्त्यांनीच महायुतीला कठीण परिस्थितीत उभे केले आहे. शुक्रवारी (ता. २१) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी एक गोष्ट आहे की तळेगावची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. उलट अपक्षांच्या बंडामुळे अधिकच रंगतदार झाली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com