तळेगाव नगरपालिकेत यावेळी २१ नवे चेहरे
तळेगाव दाभाडे, ता. २४ : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत यावेळी मोठा बदल घडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप महायुतीने १४ प्रभागांतून एकूण २८ नगरसेवक निवडून आणत निर्विवाद बहुमत मिळवले. यामध्ये तब्बल २१ नवे चेहरे सभागृहात दाखल झाले आहेत. केवळ सात नगरसेवकांना फेरनिवडीची संधी मिळाली.
नगर परिषदेच्या प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत उल्लेखनीय यश संपादन केले. शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते; मात्र त्यांना यश मिळाले नाही. प्रभाग क्रमांक २ अ मध्ये एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये आडनावाच्या बाबतीत काही प्रस्थापित राजकीय कुटुंबांचे प्रतिनिधित्व ठळकपणे दिसून येते. भेगडे पाच, शेळके तीन, तर दाभाडे, खळदे व भगत आडनावाचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले आहेत.
नोटा मतदानात वाढ
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ७२९ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. २०१६ च्या तुलनेत नोटा मतदानात वाढ झाल्याने मतदारांमधील असमाधान स्पष्ट झाले आहे.
महिला प्रतिनिधित्व ठळक
महिला आरक्षणामुळे यंदा महिला प्रतिनिधित्वात एकने वाढ झाली आहे. आता १४ महिला नगरसेविका आहेत. निवडून आलेल्या सर्व महिला नगरसेविका नव्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारभारात नव्या दृष्टिकोनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----

