सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांना बहार
दक्ष काटकर : सकाळ वृत्तसेवा
टाकवे बुद्रुक, ता. ११ : मावळ म्हणजे निसर्गसौंदर्य लाभलेला, सह्याद्रीने नटलेला, झाडाझुडपांनी बहरलेला तालुका. याच परिसरातील डोंगरभागांत, माळरानावर विविध रानभाज्या उगवतात. पूर्वी आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या आणि आहारात नेहमीच समावेश असणाऱ्या हा अमूल्य निसर्गखजिना आजकाल ताटातून कमी होत आहेत. अर्थातच या आरोग्यदायी, औषधी, सेंद्रीय रानभाज्यांचा विसर मावळकरांना पडत असल्याचे निरीक्षण काही ज्येष्ठ नागरिकांनी नोंदवले आहे.
‘‘रानभाज्या हिरव्या, निसर्गाचं वरदान,
शरीर ठेवती तंदुरुस्त, वाढवती जान.
डोंगरदऱ्यांत उगवतात, ना उगवतं कोणी,
या श्रावण महिन्यात, आस्वाद घ्या रे सर्वांनी..’’
या ओळींना समर्पक असा रानभाज्यांचा खजिना सध्या मावळात बहरला आहे. ‘‘मोसमी पावसाला सुरुवात झाली, की मावळ तालुक्यात रानभाज्यांचा हंगाम सुरू होतो. कोणत्याही लागवडीविना, कसल्याच रासायनिक खताचा वापर न करता या भाज्या आपोआप उगवतात. उत्तम आरोग्य राखण्यासाठी मोठी पर्वणी ठरणाऱ्या या भाज्यांबद्दल आजच्या पिढीला फारशी माहिती नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
‘‘पूर्वी आमच्या ताटात पंचपंक्वानांचा समावेश नव्हता. त्यावेळी परिस्थिती बिकट होती. गुरे वळून, भाकरी-मीठ-मिरची, दूध-भात खाऊन आम्ही दिवस काढले. विविध भाज्या खायला मिळणं त्यावेळी कठीण होतं. मात्र, पावसाळ्यात निसर्गाकडून मिळणाऱ्या रानभाज्या आम्हाला सहज मिळायच्या. आमच्या खाद्य संस्कृतीमधील या भाज्या महत्त्वाचा भाग होता. या भाज्या मिळणं आमच्यासाठी पर्वणीच असायची. या सेंद्रीय भाज्यांमुळे लोकं त्यावेळी अधिक वर्षे जगायची. आताचे दिवस बदललेत. ताटात विविध प्रकारच्या लागवड केलेल्या भाज्या येऊ लागल्या. अन रानभाज्यांचा विसर पडू लागला. हल्लीच्या काळात या भाज्या जरी तरुण पिढीला माहिती नसल्या, तरी आम्ही मोजकी लोकं या भाज्या आजही आवडीने खातो, असे दिनकर काटकर, वसंत वाडेकर या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
श्रावणात रानभाज्या चाखायला हव्यात
‘‘सध्या व्रतवैकल्यांचा महिना श्रावण सुरू आहे. या काळात अनेकांनी मांसाहार बंद केलेला आहे. बाजारात विविधवर्गीय भाज्या उपलब्ध असून, आपण त्या आवडीने खातो. यातील काहींचे उत्पादन बेसुमार रासायनिक खतांचा वापर करून घेतले जाते. पण रानमाळावर, सह्याद्रीच्या कुशीत करटोली, चिचार्डी, अळंबी, अळूची पाने, चाईचा मोहोर या रानभाज्या उपलब्ध असून त्यांचा आस्वाद आपण घ्यायला हवा,’’ असे मावळातील वडीलधारी मंडळी सांगतात.
आदिवासी नागरिकांचा आधार
‘‘डोंगरभागातून या रानभाज्यांची तोडणी करून शहरी भागात विक्री करण्याचे काम आम्ही करतो. यामुळे चार पैसेही मिळतात. आमची घरे चालण्यास मदत होते. अनेकांना या भाज्यांचा आस्वादही घेता येतो. त्यामुळे या भाज्या म्हणजे या आमच्यासाठी आधारच आहेत,’’ असं लोणावळ्यातील लक्ष्मण वाघमारे यांनी सांगितले.
- मावळात आढळणाऱ्या काही रानभाज्या
वाघाटी, कुळू, चायत, चाईचा मोहोर, बेंद्रा, भारंगी, अळंबी, करटोली, अळूची पाने, रुखवळ, घोटवेल, चिचार्डी इ.
(सूचना : डोंगरभागात-रानात काही भाज्या विषारी, अपायकारक असतात. त्यामुळे त्यांची तोडणी करताना सोबत जाणकार व्यक्ती असणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.