
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत शिवरायांना अभिवादन
तळेगाव स्टेशन, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (ता. १९) तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात शिवबा आणि राजमाता जिजाऊंच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाराजांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे सामूहिक गायन याप्रसंगी करण्यात आले. हरणेश्वर टेकडीवर उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी सफाई कर्मचारी आणि आरोग्य विभागामार्फत स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. मुख्याधिकारी सरनाईक यांनी तळेगाव नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवत पर्यावरण रक्षणाचा संदेश नागरिकांना दिला. नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाची शपथ यावेळी देण्यात आली. नगरपरिषदेच्या सर्व शाळांचे विद्यार्थी ऐतिहासिक वेशभूषा करून स्वच्छता संदेश देत आज प्रभात फेरी काढणार आहेत. नगरपरिषद आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, रणजित सूर्यवंशी, जयंत मदने, विजय शहाणे, स्मिता गाडे, रोहित भोसले, रवींद्र काळोखे, स्मिता बनसोडे, संध्या जाधव आदींनी शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन केले.