तळेगाव नगरपरिषद तर्फे महिला बचत गटांसाठी विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव नगरपरिषद तर्फे 
महिला बचत गटांसाठी विविध स्पर्धा
तळेगाव नगरपरिषद तर्फे महिला बचत गटांसाठी विविध स्पर्धा

तळेगाव नगरपरिषद तर्फे महिला बचत गटांसाठी विविध स्पर्धा

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. २४ : माझी वसुंधरा अभियानांतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नगर उपजीविका अभियान अंतर्गत बचत गट आणि सदस्य महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, जास्तीत जास्त संख्येने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धेअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या टिकाऊ वस्तू, पुनर्वापराच्या वस्तू तयार करणे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तीन हजार, द्वितीय दोन हजार आणि तृतीय क्रमांक दीड हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अपारंपरिक ऊर्जा वापर करणारे कुटुंब किंवा बचत गट, कम्पोस्टिंग व टेरेस गार्डनिंग स्पर्धेअंतर्गत मासिक विद्युत बिलामधील झालेली बचत दाखविणे, सांडपाणी अथवा वापरलेले पाणी पुन्हा बागेसाठी वापरणे, इलेक्ट्रिक वाहन वापरणे, सौर ऊर्जेचा दैनंदिन जीवनात वापर करणे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास तीन हजार, द्वितीय दोन हजार आणि तृतीय क्रमांक दीड हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पथनाट्य सादरीकरण स्पर्धेअंतर्गत शहरात किमान पाच प्रयोग करणे अपेक्षित आहे. कलाकारांनी वेशभूषा आणि नगरपालिका बॅनरसह, पथनाट्याचे व्हिडिओ फोटोसह जीपीएस टॅग करणे गरजेचे आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक सात हजार, द्वितीय पाच हजार आणि तृतीय क्रमांक तीन हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा फक्त बचत गटांच्या महिलांसाठीच आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बचत गटाने किंवा महिलांनी स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात शुक्रवार ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत. परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून पत्रकार, समाजसेविका, शाळेच्या मुख्याध्यापिका असणार आहेत.