
नियंत्रण सुटलेल्या कंटेनरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू वडगाव फाट्याजवळील घटना ः तीन विद्यार्थ्यासह दोन दुचाकीस्वार जखमी
तळेगाव स्टेशन, ता. ३ : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने दोन दुचाकीला ठोकर दिली. त्यानंतर पायी चाललेल्या विद्यार्थ्यांनाही धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी (ता. २) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव-चाकण महामार्गावर वडगाव फाट्यानजीक ही घटना घडली. शिव बालन एस (वय- २०, रा. चेन्नई) असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गासह तळेगाव-चाकण महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.
चाकणहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले होते. त्यामुळे त्याने दोन दुचाकींना धडक दिली. त्यात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यानंतर कंटेनरने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली. त्याचवेळी पायी चाललेल्या विद्यार्थ्यांना गंभीर जखमी केले. अपघातानंतर चालक पळून गेला.
जखमी विद्यार्थी हे तळेगावातील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चेन्नई येथून आले होते. मोटार सायकलवरील जखमी संतोष बोऱ्हाडे आणि सागर बोऱ्हाडे यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीवर झालेल्या या अपघाताची माहिती कळताच दोन्ही पोलिस ठाण्यांसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पोचत, कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी जखमी दुचाकीस्वार सागर बबन बोऱ्हाडे (वय २७, रा. वडगाव मावळ) याच्या फिर्यादीवरून कंटेनरच्या (क्रमांक एम एच ४८, बीएम-३५६०) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.