पथविक्रेत्यांनी व्यापला तळेगावातील रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथविक्रेत्यांनी व्यापला तळेगावातील रस्ता
पथविक्रेत्यांनी व्यापला तळेगावातील रस्ता

पथविक्रेत्यांनी व्यापला तळेगावातील रस्ता

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १ : तळेगाव स्टेशन रस्त्याला जिजामाता चौक ते स्टेशन चौक तसेच मारुती मंदिर ते लिंबफाटा रस्त्याला दुतर्फा पथविक्रेते, फेरीवाले आणि अतिक्रमणांनी गराडा घातला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा येऊन वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. या मार्गावर पथविक्रेत्यांनी अतिक्रमण करून रस्ता व्यापला असल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच पदपथावर व्यवसायाचे बस्तान बसविल्याने नागरिकांना चालण्यास जागा ठेवली नाही. त्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.


सद्यःस्थिती
- तळेगाव ते स्टेशन रस्त्याकडेला दुतर्फा अतिक्रमणांमध्ये वाढ
- पथविक्रेते, फळ-भाजी विक्रेते, पथारी आणि इतर व्यावसायिकाकडून स्टॉल लावून विक्री
- पदपथावर अथवा पदपथाच्या पुढे रस्त्यावर वस्तू मांडून व्यवसाय
- वाहतूक कोंडी होत असल्या वादविवादाचे प्रसंग
- जिजामाता चौकातील बस थांब्याच्या उर्वरित सांगाड्याभोवती परप्रांतीय ज्यूसवाल्यांचा गराडा
- बिगारी कामगार आणि भिकारी बसून असल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ
- पीएमपीएल बसला येथे थांबायला जागा नसल्याने रस्त्याच्या मधोमध प्रवाशांची चढउतार
- बस मधेच थांबत असल्याने वाहतुकीचा खोळंबा
- फळविक्रेते रस्त्यावर गाड्या लावत असल्यानेने वाहतूक कोंडी नित्याचीच
- स्टेशन चौक ते जिजामाता चौक ते मारुती मंदिर ते लिंबफाटा दरम्यान अपवाद

सार्वजनिक जागेच्या भाड्यातून वरकमाईचा धंदा
तळेगावातील बऱ्याच गाळेमालकांनी, दुकानधारकांनी आपापल्या दुकानासमोर पत्राशेड टाकून अतिक्रमण केले आहे. त्याहीपुढे जाऊन दुकानासमोर कायमस्वरूपी वाहने उभी करून ठेवणे. दुकानासमोरील रस्त्यावर एखाद्या हातगाडीवाल्याला स्टॉल लावून त्याकडून भाडे उकळणारे महाभाग तळेगावात वाढले आहेत. स्टेशन चौक ते लिंब फाटा या शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अशा अतिक्रमणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे अतिक्रमित रस्त्यावरून जातात रहदारीस अडथळा येऊन वाहतूक कोंडी वाढली आहे. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणातून वरकमाईचा धंदा करणाऱ्या या महाभागांवर कडक कारवाईची गरज आहे.

‘‘फेरीवाल्यांनी अतिक्रमण करणे हे नित्याचेच झाले आहे. त्यांची अरेरावी नंतर वाढत जाते. आपल्याला आता कुणाची भीती उरलेली नाही, ही मानसिकता वाढीस लागते. अशा फेरीवाल्यांवर नगरपरिषदेने सातत्याने कारवाई करून नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, सामान्यांनी रस्त्यावरून चालायचे की यांच्याकडून खरेदी करायची असा प्रश्न निर्माण होईल.
- प्रकाश दातार, ज्येष्ठ नागरिक, तळेगाव स्टेशन

‘‘मध्यंतरीच्या काळात शिथिलता आलेले अतिक्रमण विरोधी पथक पुन्हा जोमाने कार्यरत करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या पथारीवाले, हातगाडीवाले आणि फळविक्रेत्यांवर लवकरच प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत. जिजामाता चौक ते मारुती मंदिर चौक दरम्यान चिंचोळ्या रस्त्यावरील खासगी कच्ची पक्की अतिक्रमणे लवकरच हटवून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे.’’
- एन. के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

सकाळ आवाहन
तळेगावातील रस्त्यांवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास होत असून, वाहनचालकांनाही कोंडीला सामोरे जावे लागत आहे, याबाबत आपल्याला काय वाटते?