
Illegal Hoarding : अनधिकृत होर्डिगमुळे ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांची वाढली डोकेदुखी
तळेगाव स्टेशन - अनधिकृत होर्डिगमुळे ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. झाडे, फांद्या तुटून खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या तुलनेत अनधिकृत होर्डिंगवरचे फाटलेले फ्लेक्स वीजवाहक तारांमध्ये अडकल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
शहरी भागात भूमिगत केबल्स असल्याने तिकडे होर्डिंग मोठ्या प्रमाणावर असले तरी, त्याचा फारसा परिणाम वीजपुरवठ्यावर होताना दिसत नाही. मात्र, तळेगावसारख्या निमशहरी, ग्रामीण भागात अद्याप वीजवाहक तारांचे जाळे सार्वत्रिक आणि विशेषतः: रहदारीच्या मुख्य रस्त्यांशी समांतर मोठ्या प्रमाणावर आहे. रस्त्याच्या कडेची मोक्याची ठिकाणे हेरून होर्डिंग उभारणे हे जाहिरात एजन्सीचे मुख्य लक्ष्य असते. त्यामुळेच अनेकांचे बळी घेणारे हेच अनधिकृत होर्डिंग घेत आहेत.
पुणे- मुंबई महामार्ग, तळेगाव-चाकण महामार्गासह तळेगाव दाभाडे परिसरातील वीजवाहक तारांच्या मुळावर उठले आहेत. गेल्या दीड महिन्यात मावळात वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान होर्डिंगचा सांगाडा तारांवर कोसळून अथवा फ्लेक्स फाटून तारांमध्ये अडकल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या पंधराहून अधिक घटना घडल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानुषंगाने अनधिकृत होर्डिंगमुळे ‘महावितरण’ची डोकेदुखी वाढली आहे. वीजवाहक तारांमध्ये अडकलेले फ्लेक्स काढून वीजपुरवठा सुरळीत करणे महावितरण कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आणि जिकिरीचे ठरत आहे. तारांमध्ये अडकलेला फ्लेक्स काढण्यासाठी क्रेन अथवा ट्रकच्या टपावर उभे राहून काढावा लागतो. त्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळेच साहजिकच अधिक काळ वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याची मागणी जोर धरत आहे.
‘महावितरणने एकदा सर्व अनधिकृत होर्डिंग स्वखर्चाने काढून टाकावेत. जेणेकरून पावसाळ्यात त्यांच्यावर कामाचा ताण येणार नाही. मात्र, मुळात हे होर्डिंग उभारणारे नगर परिषदेचीच परवानगी घेत नसल्याने महावितरण प्रशासनास जुमानणार कोण, हा प्रश्न आहे.
- अनिल धर्माधिकारी, ज्येष्ठ नागरिक, तळेगाव दाभाडे
‘वीजवाहक तारांशेजारी उभारलेल्या होर्डिंगचे फ्लेक्स वादळ, वाऱ्यासह पावसामुळे फाटून तारांमध्ये अडकल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. वीजवाहक तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटल्याने फांद्या तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणे महावितरणच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यावर नगरपरिषद अथवा स्थानिक ग्रामपंचायतीकडून कारवाई अपेक्षित आहे.
- राजेंद्र गोरे, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, तळेगाव दाभाडे