‘रोटरी’च्या सोहळ्यात वीस जोडपी विवाहबद्ध

‘रोटरी’च्या सोहळ्यात वीस जोडपी विवाहबद्ध

तळेगाव स्टेशन, ता. २९ : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोट्रॅक्ट क्लब आणि आमदार सुनील शंकरराव शेळके फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २८) येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वीस जोडपी विवाहबद्ध झाली.
थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील मराठी शाळेच्या प्रांगणात शनिवारपासूनच लगीनघाई चालू होती. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या लग्नमंडपामध्ये रविवारी सकाळपासूनच मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, पुणे, पिंपरी, चिंचवडसह शेजारच्या अहिल्यानगर, रायगड, मुंबई या परजिल्ह्यांतील वीस वधू वरांसह वऱ्हाडी मंडळी दाखल झाली होती. सकाळी अकरा वाजता पुरोहितांच्या उपस्थितीत साखरपुडा आणि हळदी समारंभ थाटामाटात झाला. पारंपरिक हळदी समारंभात वधू वरांच्या नातेवाइकांसह रोटरी सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आनंद घेतला. विवाह सोहळ्यानंतर पाच ते सहा हजार वऱ्हाडी मंडळीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर भेगडे आळी येथील मारुती मंदिरापासून रथ, ढोल, लेझीम पथक, बँड पथकासह वरांची मिरवणूक काढण्यात आली. वधू, वर बोहल्यावर चढण्यापूर्वी वाद्यांच्या गजरात निघालेल्या वरातीत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलखुलासपणे नाच करीत ताल धरला. हिंदू संस्कृतीप्रमाणे सर्व विवाहसंस्कार थाटामाटात पार पडले. आयोजकांतर्फे वधू-वरांना रोटरी सिटीच्या वतीने पूर्ण पोशाख, गॅस शेगडी, गोदरेज कपाट, संसारोपयोगी भांडी, शिलाई मशिन, टेबल फॅन, मनगटी घड्याळ, प्रत्येक वधूस सोन्याची नथ व जोडवी मोफत देण्यात आल्या. सोडतीद्वारे दोन भाग्यवान जोडप्यांना दोन गीर जातीच्या गायी तसेच तीन जोडप्यांना तीन मोबाईल फोन भेट देण्यात आले.
आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक माउली दाभाडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, विठ्ठल शिंदे, गणेश भेगडे, बाबूराव वायकर, गणेश खांडगे, निवृती शेटे, ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, सुरेश चौधरी, सुहास गरुड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. रोटरी‌च्या जिल्हा प्रांतपाल शीतल शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले उपस्थित होते.
सुरेश शेंडे यांनी वऱ्हाडींचे स्वागत केले. सूत्रसंचालन सचिव भगवान शिंदे, सुरेश दाभाडे, प्रदीप टेकवडे यांनी केले. विलास काळोखे, किरण ओसवाल, भगवान शिंदे, दिलीप पारेख, सुरेश धोत्रे, हरिश्चंद्र गडसिंग, संजय मेहता, नितीन शहा, मनोज ढमाले, प्रदीप मुंगसे, दीपक फल्ले, रितेश फाकटकर, विश्वास कदम, विनोद राठोड यांनी नियोजनासाठी परीश्रम घेतले. विशेष म्हणजे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी वराती, स्वागतोत्सुकापासून ते वाढप्यापर्यंत सर्व भूमिका बजावल्याने वधू वरांसह नातेवाइकांमध्ये कृतज्ञताभाव उमटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com