
तळेगाव स्टेशन, ता. १८ : ‘‘श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याशी असलेली सव्वाशे एकर गायरान जमीन ताब्यात घेऊन वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारतर्फे येथे कॉरिडॉर विकसित केला जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याकामी सर्वतोपरी मदत केली जाईल,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १८) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सदिच्छा भेट दिली. श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांनी ट्रस्टच्या वतीने पवार यांचे स्वागत केले. तुकोबांची पगडी घालून सत्कार करण्यात आला. संत तुकोबारायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पवार यांनी दर्शन घेतले. मावळचे आमदार सुनील शेळके, माउली महाराज कदम, ट्रस्टचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रकाश सोमवंशी, प्रशांत भागवत यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
भंडारा डोंगरावर दीड तास थांबून उपमुख्यमंत्री पवार यांनी मंदिर बांधकामाची सखोल पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नियोजित मंदिर परिसराचे नियोजन, रचना, श्रद्धास्थळ म्हणून वारकरी, भाविकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा आणि भावी पिढ्यांसाठी संत साहित्य व आध्यात्मिक वारसा जपण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. संत तुकाराम महाराजांचे कार्य, विचार आणि वारसा अखंडपणे टिकवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगतानाच मंदिराची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना पवार यांनी संबंधितांना दिल्या.
पवार म्हणाले, ‘‘कुठल्याही शासकीय मदतीशिवाय वारकरी आणि सर्वसामान्यांच्या योगदानातून श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर उभारले जात असलेले अप्रतिम आणि दिव्य मंदिर हजारो वर्ष टिकू शकेल. अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर वारकरी संप्रदायाचे हे आकर्षक असणार आहे. संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे भक्ती, वैराग्य आणि सामाजिक समतेचा मूर्तिमंत आदर्श असून, तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. मंदिर बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द पवार यांनी विश्वस्त समितीला दिला. ट्रस्टचे अध्यक्ष काशीद यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती पवार यांना दिली.
भंडारा डोंगर : संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.