माजी आमदार कृष्णराव भेगडे अनंतात विलीन

माजी आमदार कृष्णराव भेगडे अनंतात विलीन

Published on

तळेगाव स्टेशन, ता.१ : मावळचे माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत मंगळवारी (ता.१) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुतणे आनंद भेगडे यांनी त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. ‘‘मावळच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यासू शिल्पकार हरपला,’’ अशा शब्दांत यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या अंत्यदर्शनासाठी मावळ तालुक्यासह राज्य आणि जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. मंगळवारी (ता.१) सकाळी मुंबई-पुणे महामार्गावरील लेक पॅराडाइज सोसायटीमधील भेगडे यांच्या राहत्या घरापासून बनेश्वर स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. भेगडे यांचे शेकडो चाहते, स्थानिक नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, माजी आमदार रामभाऊ कांडगे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माउली दाभाडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, नंदकुमार शेलार, संतोष खांडगे, डॉ. सुचित्रा नागरे यांच्यासह मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर अंत्यसंस्कारसमयी उपस्थित होते.

मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, पिंपरी चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात आदींनी प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्र दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कृष्णराव भेगडे यांच्याविषयी आठवणी सांगत भावना व्यक्त केल्या. अंत्यसंस्कारानंतर शांतिमंत्र पठण करीत भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांना कसा न्याय द्यायचा, याबद्दल कृष्णराव भेगडे यांच्याकडून मला मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील एक मोठे नेतृत्व हरपले आहे.
- सुनील शेळके, आमदार, मावळ

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी विधानपरिषदेवर जागा रिक्त करण्यासाठी राजीनामा देणारे कृष्णराव भेगडे हे एकमेव आमदार होते.मावळ तालुक्याला वैचारिकदृष्टया एकसंघ ठेवण्याचे काम त्यांनी केले.
- विलास लांडे, माजी आमदार, भोसरी विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com