तालुक्याचे नाव मावळ मात्र नाक लोहगड
तळेगाव स्टेशन, ता. ९ : लोहगड अशी तालुक्याची नोंद १७९२ च्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सापडते. त्यामुळे सध्या तालुक्याचे नाव जरी मावळ असले तरी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने आता तालुक्याचे नाक लोहगड आहे,’’ असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे यांनी केले.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा समावेश झाल्याप्रित्यर्थ फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.८) सायंकाळी आनंद उत्सव, मिरवणूक व साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घनश्याम लोणकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा मुख्य आकर्षण ठरली. कार्यक्रमास डॉ. प्रमोद बोराडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे, फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे, लोहगड-विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे विचार मंचावर उपस्थित होते.
लोहगडाचा अपरिचित इतिहास उलगडून दाखविताना डॉ. बोराडे म्हणाले, ‘‘कार्ल्याच्या शिलालेखात उल्लेखलेल्या मामड या शब्दाचा अपभ्रंश होऊन मावळ असा शब्द रूढ झाला. विसापूर, लोहगड हे फक्त किल्ले नसून, भाजे गावातून सुरू होणाऱ्या मारकूट पर्वताचा एक भाग लोहगड असल्याचा उल्लेख बेडसे लेणीतील शिलालेखात सापडतो. इ. स. पूर्व २०० मध्ये बांधण्यात आलेले जगाच्या पाठीवरचे भारतातील पहिले सूर्य मंदिर लोहगड-विसापूरच्या पोटातील भाजेच्या लेणीमध्ये आहे. त्यानंतर १७७५ मध्ये मराठ्यांनीच ओडीशातील कोणार्कचे सूर्य मंदिर शोधले. जगात सर्वाधिक १,२७८ लेणी भारतात असून, पैकी एक हजार आणि सर्वाधिक लेणी पुणे जिल्ह्यात आहेत. त्यातील ५७ लेणी एकट्या मावळ तालुक्यात असून, दक्षिण भारतातील लेण्यांमध्ये पहिला मान भाजेच्या लेणीला आहे. आंदर मावळात निर्मित आंद्रा सातवाहन ते भोर संस्थान अशा अनेक राजसत्ता लोहगडावर नांदल्या. वयाच्या सतराव्या वर्षी शिवरायांनी लोहगड स्वराज्यात घेतला. महाराजांनी वस्तुनिष्ठता जाणून कोंढाण्याचे सिंहगड, तुंगचे कठीणगड, तिकोनाचे वितंगगड विसापूरचे संबळगड नामकरण केले असले तरी लोहगडाचे नाव मात्र तेच कायम ठेवले. युनेस्कोच्या यादीत एकाही किल्ल्याला माची नव्हती. माची आणि जिभी अर्थात लपवलेला दरवाजा या दोन वैशिष्ट्यपूर्ण रचनांमुळे लोहगड युनेस्कोच्या यादीत गेला आहे.’’ दुर्ग अभ्यासकांचे समर्पण आणि त्यागही त्यामागे असल्याचे डॉ. बोराडे यांनी नमूद केले.
टेकवडे म्हणाले, ‘‘लोहगडचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला असला तरी तो टिकवणे एक मोठे आव्हान आहे. किल्ले आणि वनसंपदा टिकविण्यासाठी परिसरात नॉन-डेव्हलपमेंट झोन लागू करणे गरजेचे आहे.’’ विश्वास दौंडकर, संदीप गाडे, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, ओंकार मेंढी, सिद्धेश जाधव, अमोल गोरे आणि सहकारी दुर्गसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुपर्णा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन यांनी प्रस्ताविक केले.
तळेगाव स्टेशन : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडाचा समावेश झाल्याप्रीत्यर्थ काढण्यात आलेली मिरवणुकीत लोहगडाचा इतिहास उलगडताना डॉ. प्रमोद बोराडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.