गिधाड संवर्धनास हवी भरारी

गिधाड संवर्धनास हवी भरारी

Published on

गणेश बोरुडे ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १० ः गिधाड...नाव जरी घेतले तरी अनेकांच्या मनात भीती, कुरूपता किंवा क्रौर्याची प्रतिमा उमटते. पण खऱ्या अर्थाने बघितले, तर गिधाड हा निसर्गाचा एक जबाबदार स्वच्छता ‘कर्मचारी’च आहे. मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्गातील घाण साफ करणारा हा पक्षी आज मात्र स्वतःच नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

गिधाडांचे अस्तित्व धोक्यात का?
- डायक्लोफिनॅक या औषधामुळे मृत जनावरांचे मांस खाल्ल्यानंतर गिधाडांना विषबाधा
- वाढते शहरीकरण, खाणकाम आणि वास्तुकाम यामुळे त्यांचे अधिवास नष्ट होण्याची भीती
- गिधाडे वर्षाला एकच अंडे घालतात, त्यावरही शिकारी पळवितात
- जिलेटीन, दारूगोळ्याच्या स्फोटाच्या कंपनांचा वाढता धोका
- मृत जनावरांची उपलब्धताही कमी झाली आहे, कारण जनावरे थेट कसायाकडे पाठवतात

मावळातील गिधाडांची घटती संख्या
पुण्यामधील जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ डॉ. सतीश पांडे यांच्या ईला फाउंडेशन आणि वनविभागाच्या सहकार्याने विशिष्ट कॅमेरे बसवून शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला. २०१७ मध्ये पुण्यात भरलेल्या जागतिक पक्षी संमेलनामध्ये नागरे यांनी सादर केलेल्या निरीक्षणांची दखल घेत तेरा देशांच्या परदेशी पक्षी निरीक्षकांनी कल्हाट येथील व्हल्चर कॉलनीला भेट दिली होती. कल्हाट शिवारात स्थानिक रहिवासी चिंधू आजिवले यांच्या सहकार्यातून गिधाडांच्या वस्ती स्थानाच्या परिसरात बाहेरून आणलेली मेलेली जनावरे टाकून गिधाडांना अन्न स्रोत उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न नागरे यांनी केलेला आहे.

संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत पण...
कधीकाळी मावळातील विसापूर ,लोहगड,राजमाची आदी ठिकाणीही गिधाडांचे अस्तित्व दिसत होते. मात्र, दुर्दैवाने सद्यःस्थितीत तुरळक प्रमाणात जेमतेम दोन किंवा तीनच गिधाडे मावळात दृष्टीक्षेपास पडत असल्याची खंत नागरे यांनी व्यक्त केली. बॉम्बे नेचर हिस्टरी सोसायटी रॉयल सोसायटी प्रोटेक्टर ऑफ द बर्ड्स यांच्या सल्ल्यानुसार हरियाना, पश्चिम बंगाल, आसाममध्ये तेथील सरकारने गिधाड प्रजनन केंद्रे चालू केलेली आहेत. महाराष्ट्रात देखील रायगड नाशिक गडचिरोली जिल्ह्यात व इतर राज्यांमध्ये ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ सुरू करण्यात आलेली आहेत. त्याच धर्तीवर गिधाडांच्या अधिवासास पूरक वातावरण असल्याने सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील मावळच्या वनराईत निसर्गप्रेमी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन गिधाड संवर्धनासाठी वेळीच पावले उचलायला हवीत अशी नागरे यांची अपेक्षा आहे. त्यानुषंगाने मावळात मोठ्या संख्येने असलेल्या जलाशयांचे खडकाळ किनारे, बंद पडलेल्या दगडखाणी तसेच पाषाणांचे डोंगरपठारांवर गिधाडांना साद घालण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्या हेतूने केवळ निसर्ग अभ्यासक, पक्षी निरीक्षक अथवा वन विभागानेच गिधाडे प्रयत्न करून वाचवण्याऐवजी समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करून संवर्धन करण्याची गरज आहे.

‘‘गिधाडांची संख्या झपाट्याने घटते आहे. या पक्ष्यांचे अधिवास, अन्नस्रोत, आणि सुरक्षित प्रजनन क्षेत्र आज धोक्यात आहेत. गिधाडांच्या संवर्धनासाठी आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस कृती गरजेची आहे. गिधाडांचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे. केवळ पक्षीप्रेमी नव्हे, तर स्थानिक नागरिक, शेतकरी, पर्यावरण संस्था, शाळा, आणि युवकांनी यात पुढाकार घेतला पाहिजे.’’
- अविनाश नागरे, पक्षी अभ्यासक

कल्हाट (ता. मावळ): दशकभरापूर्वी मावळात आढळलेली गिधाडांची दुर्मिळ छायाचित्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com