पैसा फंड काच कारखान्याच्या जागा विक्रीस विरोध

पैसा फंड काच कारखान्याच्या जागा विक्रीस विरोध

Published on

तळेगाव स्टेशन, ता.१२ : लोकमान्य टिळकांनी उभारणी केलेल्या पैसा फंड काच कारखान्याच्या वास्तूची जमीन विक्री करण्याची परवानगी औद्योगिक निधी विश्वस्त संस्थेच्या विश्वस्तांना देऊ नये. अशी मागणी फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मुख्यमंत्री आणि सह धर्मदाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
टिळक यांनी ६५ एकर जागा खरेदी करून तळेगाव दाभाडे येथे नवीन समर्थ विद्यालय आणि पैसा फंड काच कारखान्याची वास्तू उभी केली होती. त्यानंतर अस्तित्वात आलेले औद्योगिक निधी विश्वस्त मंडळाचे संचालक अनेक वेळा विविध कारणाखाली संस्था आर्थिक अडचणीत आहे असे दाखवतात. तसेच सह धर्मदाय आयुक्त यांची दिशाभूल करून ६५ एकर जमिनीपैकी काही भूखंडाची संबंधितांना कमी किमतीत विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता कारखान्याला रेल्वेच्या सिग्नलला लागणाऱ्या काचेची मागणी असताना देखील संस्था आर्थिक अडचणीत का येते? याचे गौडबंगाल आजपर्यंत नागरिकांना कळालेले नाही. जमिनीसह वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असतानाही संस्थेच्या सध्याच्या संचालकांनी जमिनीची विक्री करण्यासाठी सह धर्मदाय आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. यापूर्वी अनेक वेळा जमीन विकून आता पुन्हा ७ हजार ३४४ चौरस मीटर जमीन विकण्याचा प्रस्ताव वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला आहे. या विक्रीस प्रतिष्ठानचा विरोध करून. जमिनीची विक्री करण्याची परवानगी विश्वस्तांना देऊ नये. तसेच टिळकांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक व्हावी. अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर आणि सचिव जयंत कदम यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com