अन्नामलाई दीपोत्सवाने उजळले कार्तिक स्वामी मंदिर

अन्नामलाई दीपोत्सवाने उजळले कार्तिक स्वामी मंदिर

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ५ : देहूरोड येथील पुणे-मुंबई महामार्गालगतच्या मुरुगन टेकडीवरील कार्तिकस्वामी (सुब्रमण्यम स्वामी) मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी (ता.५) सकाळपासून परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आवारात आयोजित अन्नामलाई दिपोत्सवाने कार्तिक स्वामींचे मंदिर उजळून निघाले.
मामुर्डीच्या साईनगरजवळ हिरव्यागार झाडीने नटलेल्या मुरुगन टेकडीवर द्वारका मठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींच्या हस्ते १९७५ मध्ये भूमीपूजन झालेले कार्तिकस्वामींचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर दक्षिण भारतीय गोपुरम आहे. बाजूला गणपती, बालाजी-पद्मावती, शंकर-पार्वती, हनुमान, नवग्रह, साईबाबा आदींची मंदिरे आहेत. गणेश मंदिर कलशारोहण कांची कामकोटी शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती १९८१ मध्ये झाले होते. येथील कार्तिकस्वामी मंदिर त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी बुधवारी दिवसभर खुले करण्यात आले होते. मंदिराचे मुख्य पुजारी मधुसूदन संत, श्रीराम अय्यर आणि आनंद शर्मा यांनी सकाळी कार्तिकस्वामींना विविध द्रव्यांनी महाभिषेक केला. श्री बालाजी मंदिरात सत्यनारायण महापूजा झाली. पत्नी देवी श्री वल्ली आणि देवयानी समवेत श्री सुब्रमण्यस्वामी (कार्तिकस्वामी) यांचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. वर्षभरात केवळ एकच संधी असल्याने कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या परिसरातील महिलांची संख्या लक्षणीय होती. भाविकांनी श्रद्धापूर्वक मोरपीस आणि नोटा कार्तिकस्वामींचा पदस्पर्श करून मनोभावे घरी नेल्या. भाविकांनी मंदिराच्या आवारात शेकडो दिपप्रज्वलित करून नेत्रदीपक दीपोत्सव साजरा केला. भाविकांना दिवसभर प्रसाद वाटप आणि सायंकाळी महाआरतीनंतर अन्नाभिषेक झाला. श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिर विश्वस्त संस्थेचे मुख्य विश्वस्त टी.के.स्वामिनाथन,पी. रामास्वामी,पी.सुंदरराजन यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त जवाहर, सुंदरमूर्थी,सी वेणुगोपाल,आर मुथुकुमार,षण्मुखम,माईलस्वामी, प्रेमनायगम आणि सहकार्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्तिक नक्षत्राच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता.२६) सुवर्णरथात विराजमान श्री वल्ली आणि देवयानी समवेत श्री सुब्रमण्यस्वामी (कार्तिकस्वामी) यांची वाद्यांच्या गजरात मिरवणुकीसह मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. सोबत गणपती, महादेव आणि पार्वतीच्या पालखीची देखील मिरवणूक काढण्यात येईल.

Marathi News Esakal
www.esakal.com