समस्यांचे गतिरोधक अन् प्रश्नांची कोंडी
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १९ : गेल्या दशकभरात प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार होणारे अपघात अन वाहतूक कोंडी ही प्रवासी, वाहचालकांसह रस्त्यालगतच्या स्थानिक गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. खड्डे, अपघात, मृत्यू अन श्वास कोंडणारी नित्याची वाहतूक कोंडी अशी समस्यांनी त्यांना ग्रासले आहे. एकीकडे उपाययोजना करण्यात प्रशासनाची बेफिकिरी आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या स्थितीत वर्षानूवर्षे तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत आहे.
या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील समस्यांवर उपाययोजना करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे कोणतीही ठोस कारवाई होत नाही. तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने स्थानिक नागरिक उद्विग्नावस्थेत आहेत.
हस्तांतरण लांबले
२०१५ मधील टोलमुक्तीनंतर देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने आणि भरमसाट वाढलेल्या वाहनांमुळे गेल्या दहा वर्षांत या महामार्गाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळूनही हस्तांतरण प्रक्रियेला तब्बल सात वर्षे लागली. केवळ निधीच्या घोषणा सोडल्या तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने साधा मैलाचा दगडही या रस्त्यावर लावलेला नाही. प्रलंबित कामाचा चेंडू पुन्हा राज्य सरकारच्या कोर्टात फेकला गेला. प्रस्तावित चौपदरी उन्नत महामार्गाच्या विकास कामासाठी गतवर्षी हा एनएच-५४८ महामार्ग प्राधिकरणाकडून राज्य सरकारच्या महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरित करण्यात आला.
जबाबदारीचे प्रश्न अनुत्तरीत
धक्कादायक बाब म्हणजे अद्यापही या रस्त्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि उपाययोजना कोण करणार, हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. दुरवस्थेवर मलमपट्टी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागांतर्गत ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. दोन्ही विभाग महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असूनही त्यांच्यात समन्वय नाही. एमएसआयडीसीचे अधिकारी सद्यःस्थितीतील रस्त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. या रस्त्यावरील ग्रामपंचायती आणि नगरपरिषद प्रशासन गटारींच्या दुरुस्तीसाठी परवानगी मागते. मात्र, ती परवानगी कोण देणार, हेच कुणाला ज्ञात नाही.
खोदकाम सर्रास
दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलहिनीससह, रिंगरोड आणि इतर खासगी केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला विनापरवाना आणि धोकादायक खोदकाम सर्रास केले जाते. त्यामुळे बाजूपट्ट्यांपाशी मोठे खड्डे पडतात. काही ठिकाणी तर गुडगाभर खड्डे आहेत. रस्त्यावर धूळ उडते. चिखलामुळे अपघात वाढले आहेत. खोदकामामुळे दोन्हीकडे झालेली चाळण, नादुरुस्त वाहिन्यांमधून वाहणारे पाणी, स्त्याच्या कडेला भराव टाकून केलेली अतिक्रमणे अन अनधिकृत बांधकामे मुळातच चिंचोळ्या रस्त्यावरील वाहतुकीत मोठे अडथळे ठरतात.
बेशिस्त रिक्षाचालकांचा सुळसुळाट
तळेगाव-चाकण महामार्गावर शेकडो रिक्षा सर्रास अवैध प्रवासी टप्पे वाहतूक करताना दिसतात. केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना सर्रास ९-१० प्रवासी कोंबून भरलेले दिसतात.खराब रस्ता अन वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हे बेशिस्त रिक्षाचालक आडवे तिडवे घुसून रिक्षा चालविताना दिसतात. कुठलाही चालक परवाना अथवा आरटीओ बॅज नसलेले बहुतांश रिक्षाचालक हे मद्यपान केलेले असतात. अचानक भर रहदारीच्या रस्त्यावर अथवा चौकात थांबून प्रवासी चढ-उतार करणाऱ्या या रिक्षाचालकांवर स्थानिक वाहतूक पोलिस अन आरटीओ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
---
मुख्य चौकटी
५४ किमीमधे तब्बल ७५ गतिरोधक
एकूण ५४ किलोमीटर अंतराच्या या महामार्गाला वाहनचालक गतिरोधकग्रस्त असेच म्हणतात. याचे कारण या मार्गावर तब्बल ७५ गतिरोधक आहेत.
---
२२ किमीसाठी दोन तास
चाकण एमआयडीसी क्षेत्रातील खालुंब्रे ते सारा सिटी खराबवाडी दरम्यानच्या पट्ट्यात अवजड वाहने, कंटेनर्स आणि कंपन्यांच्या कामगार वाहतुकीच्या बसमुळे या मार्गावर तासन् तास कोंडी होते. २२ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी कधीकधी दोन दोन तास लागतात. अनेकदा वाहनाचा वेग ताशी जेमतेम दहा १० किलोमीटर असतो. कोंडी सोडविण्याच्या प्रयत्नात त्रासलेले वाहतूक पोलिस स्थानिकांच्या सहकार्याने अधूनमधून मुरूम टाकून स्वतः खड्डे बुजविताना दिसतात.
--
मुख्य कारणे
- खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी खराब झालेले रस्ते
- रस्त्यालगत भराव टाकून झालेली अतिक्रमणे
- अवैध प्रवासी वाहतूक करणारे बेशिस्त रिक्षाचालक
- बेशिस्त कामगार वाहक बस चालक
- रस्ता खराब करणारे पाण्याचे टॅन्कर
- कंपन्यांसमोरील रस्त्यावरील दुतर्फा वाहन पार्किंग
- वाहत्या सांडपाण्यामुळे खराब होणारा रस्ता
- कोंडीत उलटे घुसणारे बेशिस्त वाहनचालक
- रात्री बेफाम गाड्या हाकणारे तरकारी वाहनचालक
- तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग ५४ किलोमीटरमध्ये १५ अतिधोकादायक ठिकाणे
- पूर्णपणे डांबर निखळलेला रस्ता
- कपारींचे खोल खड्डे
- तुटलेले पूल अन क्रॅश बॅरियर्स
- दिशादर्शक फलकांचा अभाव,
- बाजूपट्ट्यांवरील खोल खड्डे
- रस्त्यावर वाहणारे पाणी
- डांबरीकरण दर्जेदार नसल्याने पाणी साचून पडलेले मोठे खड्डे
-
---
ब्लॅक स्पॉट
इंदोरी बाह्यवळण मार्गावरील वळण, तोलानी गेट, भंडारा पायथा, सुधा पूल, खालुंब्रे, ह्युंडाई चौक, खालुंब्रे घाट, महाळुंगे पूल, सेमको गेट, खराबवाडी, चाकण (तळेगाव चौक), माणिक चौक, बहुळ घाट, साबळेवाडी घाट, टी. आय. मेटल कंपनी गेट, जातेगाव फाटा कमान, करंदी फाटा
---
येथे रस्ता नेहमीच खराब
- खालुंब्रे-ह्युंडाई चौक, खालुंब्रे घाट, बजाज ऑटो गेट, कला जनसेट गेट, महाळुंगे कमान, सेमको गेट, वाघजाईनगर फाटा, खराबवाडी, रासे फाटा, भोसे, शेलगाव भीमा नदी पूल, शेल पिंपळगाव, साबळेवाडी घाट, पिंपळे जगताप फाटा कमान, शिक्रापूर (चाकण चौक)
---
येते होते सारखीच कोंडी
वडगाव फाटा, तळेगाव स्टेशन चौक, जनरल हॉस्पिटल गेट, मराठा क्रांती चौक, देहू फाटा, खालुंब्रे- ह्युंडाई चौक, एचपी चौक, महाळुंगे कमान, वाघजाई नगर फाटा, सारा सिटी, खराबवाडी, राणूबाई मळा, चाकण चौक, माणिक चौक, मेदनकर वाडी कमान, भोसे, आळंदी फाटा-शेलगाव, शेल पिंपळगाव, साबळेवाडी घाट, करंदी फाटा, शिक्रापूर (चाकण चौक)
------
महामार्गाची समस्या एवढी भयानक असूनही राज्य सरकार काम सुरू करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. साडेसातशे किलोमीटरचा समृद्धी हायवे तीन वर्षांत पूर्ण केला जातो. शक्तिपीठ पुढील तीन वर्षांत पूर्ण करतील. मग हाच महामार्ग राज्य सरकार जाणूनबुजून करत नाही का, इतर शहरांचा विकास करा, पण इथला विकास का अडवलाय, हाच मोठा प्रश्न पडतो.
- सचिन टेकवडे, नागरिक, तळेगाव दाभाडे
---
चाकण चौकापासून चारही दिशांना किमान २० किलोमीटरपर्यंत सरळ-सरळ रस्ता आहे, पण तोही नीट करणे सरकारला जमलेले नाही. नको त्या घोषणा, नको ती रेल्वे कशासाठी हा व्यर्थ खटाटोप का चालला आहे, तेच कळत नाही. बाकी सोडा, अगोदर तळेगाव-चाकण रस्ता करा, मग सगळे सुरळीत होईल.
- शशिकांत कड, सामाजिक कार्यकर्ते, खराबवाडी
---
खालुंब्रे (ता.खेड) : टँकरमधून सांडणाऱ्या पाण्यामुळे झालेली रस्त्याची दुरवस्था.
खालुंब्रे (ता.खेड) : डांबर निखळून पडलेल्या खड्ड्यांमुळे घाटातील रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी.
खालुंब्रे (ता.खेड) : वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी.
खालुंब्रे (ता.खेड) : टँकरमधून सांडणाऱ्या पाण्यामुळे मध्यभागी खराब झालेला घाटातील रस्ता.
तळेगाव दाभाडे : रस्त्यालगत बाजूपट्टीवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून झालेले धोकादायक डबके.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

