तळेगावात श्री गजानन महाराजांचा जयघोष
तळेगाव स्टेशन, ता. ९ : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रविवारी (ता. ८) तळेगाव दाभाडे शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने आणि श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. राव कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरासह शहरातील विविध भागांत आयोजित प्रकट दिन सोहळ्यांना भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त संत तुकाराम नगर येथील मंदिरात आठवडाभर गजानन नामजप, दररोज सायंकाळी भजन-संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाश पटवर्धन यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण झाले. रविवारी (ता. ८) सकाळी काकडा आरतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचे पठण, सामुदायिक अथर्वशीर्ष आणि रामरक्षा पठण होऊन मंत्रजागर करण्यात आला. दुपारी १२ वाजता महाआरती झाली. त्यानंतर दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत निरंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी कीर्तन झाले आणि महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. मंदिर परिसरात फुलांची व रांगोळीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गिरिश मालपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले.
तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगरमधील यशोधाम हॉलमध्ये गजानन भक्त परिवार व कै. श्री आपटे आजी संस्थापित ‘एक आनंद सोहळा’ अंतर्गत श्री गजानन महाराज शेगाव प्रकट दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक रांगोळीने सभागृहाची शोभा वाढविली. कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये सकाळी श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण झाले. दुपारी २ वाजता आरती करण्यात आली. यशोधाम हॉलमध्ये सकाळी अभिषेक, पूजा व आरती झाल्यानंतर भजन-कीर्तन झाले. सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत महाप्रसाद वाटप करण्यात आले. रात्री साडेनऊ वाजता महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. आपटे परिवारासह प्रमोद देशक व भक्त मंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले.
यशवंतनगरमधील बालाजी मंदिरालगत यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात पूजा, महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता आळंदी देवाची येथील संतकृपा ज्ञानदान-अन्नदान संस्थेचे शिवशंभू चरित्रकार सोमनाथ महाराज भालेराव यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ७ वाजता आरतीने सोहळ्याची सांगता झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संविद पाटील व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

