तळेगाव दाभाडे परिसराला वादळी वाऱ्यासह गारांचा मारा

तळेगाव दाभाडे परिसराला 
वादळी वाऱ्यासह गारांचा मारा
Published on

तळेगाव स्टेशन, ता. २ : परिसराला वादळी वाऱ्यासह गारांचा मारा करत अडीच तास झालेल्या पावसाने गुरुवारी (ता. २) दुपारी झोडपले. काहीकाळ गारा पडल्याने पादचारी आणि व्यवसायिकांची धांदल उडाली. रस्ते जलमय झाले होते. वाऱ्यामुळे तळेगाव स्टेशन परिसरातील वतननगर, अंबिका पार्क, राजगुरव काॅलनी, यशवंतनगरमध्ये फांद्या आणि झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. रेल्वे स्टेशनसमोरील वीरचक्र चौकात दुचाकीवर झाड कोसळल्याने काही दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले.
गाव स्टेशन रस्त्यावर एसटी डेपोसमोर फ्लेक्स बोर्ड रस्त्यावर पडल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. वतननगरमधील दाभाडे एम्पायरसमोर रस्त्यावर झाड पडल्याने हिंदमाता भुयारी मार्गाकडे जाणारी वाहतूक काहीकाळ बंद झाली. जवळपास अडीच तास पाऊस चालू होता. वीजवाहक तारांवर झाडे पडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून काहीकाळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला. नगरपरिषद अग्निशमन दल आणि महावितरणच्या आपत्कालीन पथकाने वीजवाहक तारांवर आणि रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केल्यानंतर सायंकाळनंतर टप्प्याटप्पाने वीजपुरवठा आणि रहदारी सुरळीत झाली. पावसामुळे हनुमान जयंती कार्यक्रमासाठी उभारलेले मंडपही फाटले. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com